मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ात बिल्डरांच्या फायद्यासाठीच चटईक्षेत्र निर्देशांक वाढविण्याचा घाट घालण्यात आला असून, वाढीव चटईक्षेत्र देण्यास काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मागणी केली असली तरी मुंबईच्या नाईट लाईफमध्ये बदल करण्याची काहीही आवश्यकता नाही, अशी भूमिका मांडली आहे.
मुंबईत आठपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांकाची खिरापत काही ठराविक बिल्डरांच्या फायद्यासाठी वाटण्यात येणार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ावर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सविस्तर चर्चा घडवून आणण्यात येईल. आरे कॉलनीचा विकास करण्यामागेही काही बिल्डरांचा फायदा व्हावा, असा उद्देश असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला.
काँग्रेस आघाडी सरकारने जादा चटईक्षेत्र शुल्क मंजूर करण्याचा प्रस्ताव शहराच्या विकासाच्या उद्देशानेच रोखला होता. पण भाजप सरकारला वाढीव चटईक्षेत्र देण्याची घाई झाल्याचे त्यांनी सांगितले.