काँग्रेसराष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राज्य सरकारमध्ये एकत्र असताना दररोज परस्परांवर कुरघोडी करणारे भाजप आणि शिवसेना नगरपालिका निवडणुकांसाठी एकत्र आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. नगरपालिका निवडणुकीत अपयश आल्यास त्याचा फटका आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच भाजप आणि शिवसेनेने माघार घेतल्याचा आरोपच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.

चार दिवसांपूर्वी परस्परांची उणीदुणी काढणारे अचानक एकत्र कसे आले, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात जनमानसात नाराजीची भावना आहे. त्याचा नगरपालिका निवडणुकीत फटका बसू शकतो याचा अंदाज आल्यानेच दोघांनी तलवारी म्यान केल्या असाव्यात, असा अंदाज खासदार चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. नगरपालिका निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ल्यास त्याचा आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो. ही भीती मुख्यमंत्र्यांना असावी. यामुळेच शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या असल्या तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र सपशेल माघार घेतल्याची टीकाही काँग्रेस व राष्ट्रवादीने केली आहे.

मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसू शकतो. ही भीतीही मुख्यमंत्र्यांना असावी, असा टोलाही दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी लगावला आहे. कितीही भांडले तरी सत्तेसाठी कसे दोघेही हपापले आहेत हेच या युतीवरून स्पष्ट होते, अशी टीका तटकरे यांनी केली. युती झाली असली तरी प्रत्यक्षात ती कितपत अमलात येते हासुद्धा प्रश्न आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यव्यापी आघाडी न करता स्थानिक पातळीवर आघाडीचे अधिकार दिले आहेत. स्थानिक नेते ठरवतील तेथे आघाडी होईल, असे तटकरे आणि चव्हाण यांनी सांगितले.