काँग्रेस आणि सुकाणू समितीचा आरोप 

शेतकऱ्यांची सुकाणू समिती तसेच प्रसारमाध्यमांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांनी तीव्र निषेध केला असून, अशा या कृतीतून सत्तेचा अहंकार दिसतो, असा आरोपही केला आहे. खरे शेतकरी कोण हे नागपूरच्या रेशीमबागेत (रा. स्व. संघाचे मुख्यालय) शोधायचे का, असा सवाल सुकाणू समितीने केला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुकाणू समितीला जीवाणू समिती आणि आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधल्याबद्दल काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य हे भाजपची संस्कृती दर्शविते, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा काँग्रेसने जनतेसमोर उघड केल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्रागा सुरू झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास शेतकरी सत्तेवरून खाली खेचतील, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यावरही गेल्या आठवडाभरात मराठवाडय़ात ३४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावरून शेतकऱ्यांचा भाजप सरकार आणि फडणवीस यांच्यावर विश्वास नाही हेच स्पष्ट होते, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या सुकाणू समितीला देशद्रोही असे संबोधले आहे. मात्र शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडणारेच खरे देशद्रोही असल्याचे प्रत्युत्तर सुकाणू समितीचे समन्वयक आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अनिल नवले यांनी दिले आहे. स्वातंत्र्यलढय़ात योगदान देण्याऐवजी ब्रिटिशांची भलावण करणाऱ्या संघटनांना गुरुस्थानी मानणाऱ्यांनी शेतकऱ्यांना देशभक्ती शिकवू नये, असा सल्लाही डॉ. नवले यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.