पक्षाचा राजीनामा दिल्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्ष राज्यात रिकामा करण्याची दर्पोक्ती केली असली तरी सिंधुदुर्ग वगळता राज्याच्या अन्य भागांमध्ये काँग्रेसवर फार काही परिणाम होण्याची शक्यता नाही. अगदी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्य़ातही फार काही फरक पडणार नाही, असे काँग्रेसचे गणित आहे.

राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचा वेगळा दबदबा होता. राज्याच्या सर्व भागांमधील आमदार त्यांच्यासोबत होते. शिवसेनेमध्ये राणे यांना मानणारा मोठा वर्ग होता. विशेषत: कोकणातील शिवसेनेचे कार्यकर्ते राणे यांच्या सोबत होते. काँग्रेसमध्ये मात्र राणे यांना तेवढा मानणारा वर्ग नाही. कोकणाबाहेर व तेही सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या बाहेर राणे यांची तेवढी ताकदही आता राहिलेली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे पूत्र निलेश हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघात नारायण राणे यांचा पराभव झाला. म्हणजेच सिंधदुर्ग आणि रत्नागिरी या राणे यांच्या एकेकाळच्या बलस्थान असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये राणे यांची जादू चालली नव्हती.

जिल्हा परिषद निवडणुकीत राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला बहुमत मिळाले. रत्नागिरी जिल्ह्य़ात काँग्रेसचा दारुण पराभवच झाला. मुंबई किंवा ठाण्यात राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा २००७, २०१२ आणि २०१७च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये  उपयोग काँग्रेससाठी आता प्रत्येक जिल्हा किंवा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. यामुळे सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे नुकसान होऊ शकते. राणे यांची भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू झाली तेव्हाच काँग्रेसने सिंधुदुर्गमध्ये नुकसान होईल ही खूणगाठ बांधली होती. जुन्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करण्याकरिता खासदार हुसेन दलवाई यांना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले होते.

राणे यांचा दबदबा कमी झाल्यावर त्यांचे राज्यातील समर्थकही पांगले. ठाण्यातील रविंद्र फाटक यांच्यासारख्या एकेकाळच्या कट्टर समर्थकाने आमदारकीसाठी शिवसेनेत धाव घेतली. पुण्यातील विनायक निम्हण शिवसेनेत गेले तर सिन्नरचे माणिक कोकाटे यांनी भाजपचा मार्ग पत्करला. अन्य काही समर्थकांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता. राणे यांच्याबरोबर शिवसेनेतून आलेले नेते किंवा कार्यकर्ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. पण राणे यांची पक्ष रिकामा करण्या एवढी ताकद नक्कीच नाही. विदर्भात राणे यांना तेवढा जनाधार नाही. मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रात राणे यांची ताकद नाही. यामुळेच राणे यांनी कितीही दावा केला तरीही कोकण वगळता राज्याच्या अन्य भागांमध्ये फार काही फरक पडणार नाही. राणे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग कोकण वगळता कोठेच नाही. पक्षाचे काही आमदार फोडण्याचा प्रयत्न मात्र राणे करू शकतील. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत काँग्रेसची २०१४ प्रमाणे वाईट परिस्थिती होण्याची शक्यता वाटत नाही. यामुळेच पक्ष सोडण्यापूर्वी नेतेही विचार करतील, असे एका नेत्याने मत व्यक्त केले.

काँग्रेसच्या काही नेत्यांना भाजपचे वेध लागले आहेत. पण राणे यांच्याबरोबर भाजपमध्ये जाणे कितपत योग्य ठरेल याची चाचपणी कार्यकर्ते करू शकतील. कारण राणे यांच्याबरोबर गेल्यास पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळेल याची खात्री झाल्याशिवाय कोणी धाडस करणार नाही.

राज्यात काँग्रेस पक्ष भक्कम आहे. कोणी पक्ष सोडून गेल्याने त्याचा पक्षावर परिणाम होणार नाही. पक्षात येण्याजाण्याची कायमच प्रक्रिया सुरू असते.   खासदार अशोक चव्हाण</strong>, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष