लोकपाल, दक्षता आयोग किंवा मुख्य माहिती आयुक्त ही पदे भरण्याचे टाळणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्ला चढवितानाच काँग्रेसने, घर खरेदीत ग्राहकांऐवजी बिल्डरांचे हित बघितल्याचा आरोप सोमवारी केला. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त मुंबईत काँग्रेसच्या वतीने उद्या निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 

यूपीए सरकारच्या काळात स्थावर मालमत्ता विधेयकात सदनिकेचे वास्तव क्षेत्रफळ (कार्पेट) दाखविण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. पण मोदी सरकारने त्यात बदल करून बिल्डरांच्या फायद्याची दुरुस्ती केल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज्य प्रवक्ते अनंत गाडगीळ आणि सचिन सावंत हे उपस्थित होते. भाजप सरकारने केलेल्या दुरुस्त्यांमुळे बिल्डरांना नक्की क्षेत्रफळ किती याची माहिती द्यावी लागणार नाही. यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार आहे. हा बदल केवळ बिल्डरांसाठी करण्यात आला आहे असा आरोप माकन यांनी केला.