पश्चिम उपनगरांमध्ये डेंग्युच्या साथीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होत असून तो रोखण्यात पालिकेचा आरोग्य विभाग अयशस्वी ठरला आहे. ठोस उपाययोजना करून मुंबई डेंग्युमुक्त करावी या मागणीसाठी उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २४ नोव्हेंबर रोजी बोरिवली येथून आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे. डेंग्युचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठिकठिकाणी निदर्शने करीत हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचणार आहे.
मुंबईमध्ये डेंग्युचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस डेंग्युग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर मुंबई परिसरातील उपनगरांमध्ये मोठय़ा संख्येने डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. पालिकेच्या निषेधार्थ उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘डेंग्युमुक्ती मोर्चा’ काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या बोरिवली कार्यालयाजवळून हा मोर्चा निघणार आहे. डेंग्युमुक्तीसाठी निदर्शने करीत काँग्रेस कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दुपारी २ वाजता पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.