उर्जा खात्यात गेल्या १० वर्षांत झालेल्या करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करीत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला टोमणे मारल्याने सत्ताधारी मात्र विरोधकांमधील दुफळीमुळे खुशीत होते. महावितरण कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्यावरही विखे-पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडत त्यांनी दिलेल्या कंत्राटांच्या चौकशीची मागणी केली.
वाढत चाललेले वीजदर, तीनही वीजकंपन्यांचे रखडलेले प्रकल्प, महावितरणच्या कारभारामुळे ग्राहकांना भोगावा लागत असलेला त्रास यासह अनेक मुद्दे जयकुमार रावल, डॉ. जयप्रकाश मुंदडा, राजेंद्र पाटणी आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केले होते. या चर्चेत विखे-पाटील यांनी उर्जाखात्याच्या कारभारावर हल्ला चढविताना मेहता यांनाही ‘लक्ष्य’ केले. कमी दर्जाचा कोळसा खरेदी केल्याने सरकारी वीज कंपन्यांमधील प्रकल्पांमधून कमी वीजनिर्मिती होते. सरकारी वीजप्रकल्पातील वीजनिर्मिती कमी करुन खासगी वीजखरेदीला प्राधान्य देण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक मेहता यांनी ४३७२ कोटी रुपयांची कंत्राटे एका दिवसात मंजूर केली. ८०० कोटी रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली नाही. महावितरणच्या सल्लागार कंपनीला ३० कोटी रुपये दिल्याची माहिती एका कंपनीने आपल्या दाव्यात दिल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली. बिल वसुली खासगी कंपनीला देणे, मीटर रीडींगचे खासगीकरण यासह अनेक बाबींची कंत्राटे मेहता यांनी दिली. या सर्व कारभाराची चौकशी करुन श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणीही विखेपाटील यांनी केली.

मुळा-प्रवरा संस्थेच्या कारभाराची सीबीआय चौकशी केली तरी माझी तयारी आहे, पण उर्जा खात्यातील गैरव्यवहारांची चौकशी होणे गरजेचे आहे.
-राधाकृष्ण विखे-पाटील,विरोधी पक्षनेते