गेल्या वेळी वाटय़ाला आलेल्या फक्त १७४ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम काँग्रेसने सुरू केला असला तरी राष्ट्रवादीने सोमवारपासून सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आघाडीबाबत सावध भूमिका घेतली असली तरी राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.
काँग्रेसचा इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. दुसऱ्या दिवशी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर यंदा काँग्रेसमध्ये नेहमीचा उत्साह दिसत नाही, असे संसदीय मंडळातील सदस्यांकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आदी या मुलाखतींना उपस्थित होते. विदर्भातील ४९ तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ५३ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी खान्देश, कोकण, मुंबईतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. नारायण राणे अध्यक्ष असलेल्या प्रचार समितीची पहिली बैठक शुक्रवारी टिळक भवनमध्ये होणार आहे. प्रचाराच्या संदर्भात राणे यांनी मंगळवारी समितीचे समन्वयक आमदार मुझ्झफर हुसेन व अन्य सदस्यांशी प्राथमिक चर्चा केली.

राष्ट्रवादीची मुलाखतीत आघाडी!
काँग्रेसने आघाडीत बिघाडी होणार नाही याची खबरदारी घेतली असली तरी राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते बुधवार तीन दिवस सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. कोणत्या जागा वाढवून मिळतील वा अदलाबदल होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. म्हणूनच सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.