स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बोलणी अंतिम टप्यात असून काँग्रेस चार जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागा लढवेल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली.
मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि धुळे-नंदूरबार या चार ठिकाणीच्या जागा काँग्रेस लढवेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा, अहमदनगर आणि सोलापूर या तीन मतदारसंघांत निवडणूक लढणार आहे. आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बठक झाली. त्यात जागावाटपावर चर्चा झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच धनंजय मुंडे उपस्थित होते. तर काँग्रेसकडून चव्हाण यांच्यासह माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे उपस्थित होते. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने सात जागांवर दावा केला होता, मात्र चर्चेदरम्यान ज्या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या समर्थकांनी जिंकल्या आहेत त्या त्यांनाच देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली. त्यांचा हा पर्याय काँग्रेसने मान्य केल्याचे समजते.
२ डिसेंबरच्या सुमारास या संदर्भात अंतिम बठक होईल आणि त्यानंतर जागावाटप घोषित केले जाईल. काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदारकीसाठी पी. एन. पाटील, सतेज पाटील आणि महादेव महाडिक अशा दिग्गजांचे अर्ज आले आल्याची माहिती चव्हाण यांनी या वेळी दिली.
राणेंचा अद्याप संपर्क नाही
मुंबईतून भाई जगताप यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देणार काय, असे विचारता, उमेदवारीसाठी राणे यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. तसेच काँग्रेसमध्ये उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा मोर्चा
देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोच्र्यासाठी शेकडो काँग्रेस कार्यकत्रे गावागावांत संपर्क साधत असल्याचे अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.