मुसळधार पावसामुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पालिकेकडून दरवर्षी चार महिन्यांकरिता कंत्राटी कामगारांची फौज सज्ज केली जाते. यंदा जुलै महिना सुरू झाला तरी कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीसाठी पालिकेला मुहूर्त सापडलेला नाही.
याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांच्याच दालनात पडून आहे. परिणामी पावसाळ्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनुष्यबळाअभावी पालिका दुबळी ठरण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होऊ नये, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाते. पावसाळ्यातील कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन दरवर्षी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये १ जून ते १० ऑक्टोबर या कालावधीसाठी ७०० कंत्राटी कामागारांची नियुक्ती करण्यात येते. दरवर्षी मजूर संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या कामगारांना किमान वेतन म्हणून प्रतिदिन २३० रुपये दिले जातात.