डॉ. राजेंद्र सिंह यांचा बिनीचा सवाल; ‘जनजागृती यात्रे’चे आवाहन
‘पाणी पिण्यासाठी द्यायचे की उसासाठी’, याबाबत मराठवाडय़ासारख्या विभागात विचार करण्याची वेळ आता आली असून ऊस पिकविण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी त्याचबरोबर पीक नियोजन आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘जनजागृती यात्रा’ काढण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी येथे केले. देशातील धरणांपैकी ४० टक्के महाराष्ट्रात असूनही पाणीवापराचे व्यवस्थापन किंवा सुयोग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही येथेच अधिक आहेत, असे डॉ. राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या वाटेवरून जाताना मानवी हव्यासामुळे निसर्गसंपदेची लयलूट होत असून हा ऱ्हास थांबविण्यासाठी आणि पर्यावरणविषयक महत्वाच्या मुद्दय़ांवर सांगोपांग चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘टीजेएसबी बँक’ यांच्यातर्फे आणि ‘रिजन्सी ग्रुप’ व ‘केसरी’च्या सहकार्याने दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याचा समारोप करताना डॉ. राजेंद्र सिंह यांनी पर्जन्यमान आणि पीकपद्धती यांची सांगड घातली पाहिजे आणि जलसंधारणाबरोबरच पाणीवापराचे नियोजन करून स्थायी विकास साधणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. महाराष्ट्रात मराठवाडय़ासारख्या भागात पिण्यासाठी पाणी नाही, तेथे ऊस कसा पिकविला जाऊ शकतो, महत्त्वाचे काय आहे, असा मुद्दा उपस्थित करून डॉ. राजेंद्र सिंह यांनी जलसाक्षरतेसाठी जनजागृती यात्रा काढण्याचे आवाहन करून त्यासाठी आपले सक्रिय सहकार्य देण्याची तयारी दाखविली. १ ते ५ डिसेंबर या कालावधीत कोकणात जनजागृती यात्रा काढणार असून मराठवाडा व विदर्भातही त्या काढण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
हवामानबदलाचे गांभीर्य
हवामानातील बदल हे गांभीर्याने घेण्याची गरज असून त्याच्या परिणामांमुळे मराठवाडय़ात वाईट अवस्था आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे पाणीव्यवस्था, पीकपद्धती यावर चिंतन करून त्याला अग्रक्रम दिला गेला पाहिजे, असे परखड मतप्रदर्शन पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केले. मूठभर लोकांच्या अर्थकारणासाठी राजकीय खतपाणी मिळून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असेल, तर आता आपण क्रियाशील झाल्याशिवाय काहीही होणार नाही, असे देऊळगावकर यांनी स्पष्ट केले.
टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष सी. नंदगोपाल मेनन यांनी या परिसंवादाबाबतची भूमिका मांडताना मानवी जीवन सुखकर करण्याच्या दृष्टीने पर्यावरणीय दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे, याविषयी विवेचन केले.
शहरांमधील वाहनांमुळे होणारे प्रदूषण, विघटन होणारा कचरा, वैद्यकीय कचरा, इलेक्ट्रॉनिक्ससह विघटन न होणारा कचरा आणि त्यातून निर्माण होणारे विविध प्रश्न कसे सोडविता येतील, यासह अगदी प्रकाशाचे प्रदूषण आणि अवकाशातील कचरा यासारख्या ‘प्रकाशझोतात’ नसलेल्या विषयांवरही या परिसंवादात सविस्तर ऊहापोह झाला. सर्वच वक्त्यांनी या विषयांचे पैलू मांडले. त्यातून पर्यावरणीय संतुलन राखणे हे मानवी जीवनाच्या दृष्टीने किती बहुमूल्य आहे, याचे महत्त्व अधोरेखित झाले.

पर्यावरण नोंदी

’ पिठूर चांदणे आणि स्वच्छ आकाश पुढील काही वर्षांत भारतात दिसू शकणार नाही
’ऊर्जेचा मर्यादित वापर करून कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आवश्यक
’जलसाठे प्रदूषित करून होणाऱ्या विकासाच्या संकल्पना पुरेशा स्पष्ट व्हाव्यात
’विघटन होणाऱ्या कचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी
’प्रदूषण करणाऱ्या उद्योगपतींना जबर आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाई होणार का?