ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर स्वातंत्र्यलढय़ातील प्रेरणास्थानांना वंदन करण्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्याने, क्रांती दिनाचे नवे राजकारण महाराष्ट्रात रंगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी ऐतिहासिक ‘ऑगस्ट क्रांती मैदान’ येथे आदरांजली न वाहिल्याने विरोधकांनी टीकेचे सूर लावले. वृत्तवाहिन्यांवरूनही हेच सूर उमटल्यावर नेत्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ऑगस्ट क्रांती मैदानावर धाव घेऊन स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन केल्याची टीका सुरू झाली. मात्र तावडे, दानवे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेत विरोधकांच्या आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला. शहिदांचा सन्मान कसा राखावा हे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिकण्याची आम्हाला गरज नाही, असा टोलाही त्यांनी मारला.
मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथे क्रांती दिनाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. पण मुंबईत ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरील आदरांजली कार्यक्रमास मुख्यमंत्री व अन्य कोणीही भाजप शिवसेनेचे मंत्री उपस्थित नव्हते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर, नवाब मलिक यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यावर आणि खासगी वाहिन्यांवरून बातम्या दाखविण्यास सुरुवात झाल्यास सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे तेथे पोचले. आपण नियोजित वेळेनुसार बाराच्या सुमारास ऑगस्ट क्रांती मैदानात पोचलो आणि सरकारच्या वतीने आदरांजली वाहिली आहे. मी रवींद्र नाटय़ मंदिरातील कार्यक्रम आटोपल्यावर तेथे गेलो व दरवर्षी जातो. माझे कार्यक्रम मी प्रसिद्धीमाध्यमांमधील बातम्यांवरून ठरवीत नाही, असे तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही विरोधकांचे आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
महात्मा गांधीजींची शिकवण बाजूला सारून भाजप सरकार आपली तत्त्वे आणू पाहात असल्याचा आरोप मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला. ‘चले जाव’ चळवळीची हाक देण्यात आली, त्या ऑगस्ट क्रांती मैदानात जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.

ऑगस्ट क्रांती दिनी सत्ताधाऱ्यांनी स्वातंत्र्यलढय़ातील हुतात्म्यांकडे दुर्लक्ष केले.
-अशोक चव्हाण,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष