दोन वर्ष उलटूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतचा निर्णय झाला नसताना शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळ पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या मैदानावर बाळासाहेबांच्या जयंती दिनी, शुक्रवारी पेटवण्यात आलेली ‘अखंड ज्योती’ तेवत ठेवण्यासाठी महानगर गॅसला दर महिन्याला ९० हजार रुपये देण्यास पालिकेने होकार दिला असून विरोधी पक्षनेत्याने सेनेच्या मनमानी कारभाराला विरोध केला आहे.
पर्यावरणाबाबतच्या परवानगीमुळे शिवाजी पार्क येथे स्मारक करण्यासाठी सेनेच्या नेत्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले. त्यातच  पालिकेच्या तिजोरीतून साडेपाच लाख रुपये खर्च करून बांधलेल्या ‘अखंड ज्योती’ला कोणाच्या खर्चाने इंधन पुरवायचे त्यावरून वाद रंगला आहे. ही ज्योत बांधण्यासाठी काचेचे तावदान तयार करण्यास आणि त्याच्या बांधकामाला अडीच लाख रुपये खर्च झाले असून तीन लाख रुपये भरून महानगर गॅसची पाइपलाइन तिथपर्यंत नेण्यात आली आहे. ही ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी दर महिन्याला महानगर गॅसला ९० हजार रुपये देण्याचे पालिकेने ठरवले आहे. मात्र या निर्णयाबाबत सर्वाना अंधारात ठेवले गेल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केला.
बाळासाहेबांचे स्मारक आणि अखंड ज्योतीला आमचा विरोध नाही. बाळासाहेबांविषयी आम्हाला आदर आहे. त्यांनी मुंबईकरांवर कधीही, कोणताही बोजा टाकला नाही.  मात्र या स्मारकावर पालिकेने साडेपाच लाख रुपये खर्च केले. इंधनपुरवठय़ासाठी प्रायोजक शोधला जाईल, अशी हमी राहुल शेवाळे यांनी दिली होती. मात्र प्रायोजक सापडला नसल्याने हा खर्च पालिकेच्या तिजोरीतून काढला जात आहे, असे आंबेरकर म्हणाले.
या ज्योतीला इंधन पुरवण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत रीतसर परवानगी घेतल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले. तरीही याबाबत कोणाला शंका असेल तर सेनेचे वरिष्ठ नेते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह याबाबत विचार केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
बाळासाहेबांविषयी आम्हाला अतीव आदर आहे. त्यांनी मुंबईकरांवर कधीही, कोणताही बोजा टाकला नाही.  या अखंड ज्योतीचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून काढला जात आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी असलेला निधी असा इतरत्र वळवता कामा नये.
– देवेंद्र आंबेरकर,
महापालिकेतील विरोधी पक्षनेते