खिशात सापडलेल्या तिकिटावरून मृताची ओळख पटली आणि त्यापाठोपाठ मारेकऱ्याचे नावही उघड झाले.  गेल्या सहा महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या ‘त्या’ मारेकऱ्याने आपल्या बहिणीला फोन केला आणि तो पोलिसांच्या हाती लागला..

१८ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ७ वाजताची घटना. ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचारी कामात व्यस्त होते. त्याच वेळी नियंत्रण कक्षातील एक दूरध्वनी खणखणला. एका कर्मचाऱ्याने हा दूरध्वनी घेताच समोरच्या व्यक्तीने भेदरलेल्या अवस्थेत मृतदेहाची वर्दी दिली. डोंबिवली पूर्व भागातील निळजे गावामधील रेल्वे रुळाजवळ २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह पडलेला होता. नियंत्रण कक्षाला वर्दी मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कपाळावर आणि डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे पाहणीदरम्यान पोलिसांना दिसून आले. खुनाचा गुन्हा असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृताची ओळख पटविण्यासाठी त्याच्या खिशात काही कागदपत्रे सापडतात का, याची पाहणी त्यांच्या पथकाने सुरू केली. त्यामध्ये त्याच्या खिशात ‘मुंब्रा ते कुर्ला’ असे रिटर्न तिकीट सापडले. त्याव्यतिरिक्त त्याच्या खिशात एकही कागद सापडला नाही. तसेच घटनास्थळी जमलेल्या जमावापैकी एकही जण मृत व्यक्तीला ओळखत नव्हता. त्यामुळे मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हन पोलिसांपुढे होते.

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले आणि त्यांच्या पथकाने रेल्वे तिकिटाच्या आधारे तपास सुरू केला. या पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे, पोलीस नाईक सुधीर कदम, पोलीस शिपाई किरण सोनावणे यांचा समावेश होता. या पथकाने मृताच्या खिशात सापडलेल्या तिकिटाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वीच्या प्रवासाचे हे तिकीट असल्याचे उघड झाले. मात्र, अशा तिकिटांद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या नावाची नोंद होत नसल्यामुळे पथकाला मृताची ओळख पटविणे शक्य होत नव्हते. तरिही पथकाने तपासाची चिकाटी सोडली नाही. ज्या दिवसाच्या प्रवासाचे ते तिकीट होते, त्या दिवसाचे मुंब्रा आणि कुर्ला रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पथकाने पाहणी केली. त्यामध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकातील एका कॅमेऱ्यामध्ये मृत पावलेली व्यक्ती पथकाला दिसून आली. अंगातील कपडे आणि चप्पलमध्ये साम्य असल्यामुळे तो व्यक्ती मृत व्यक्ती असल्याची पथकाची खात्री झाली. डोक्यात दगड घातल्याने मृताचा चेहरा खराब झाला होता. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. त्यामुळे कॅमेऱ्याचील फुटेज पथकाने सर्वच पोलीस ठाण्यांना पाठविले आणि त्यातील व्यक्ती बेपत्ता आहे का, याची चौकशी सुरू केली; परंतु तो बेपत्ता झाल्याची नोंद झालेली नसल्यामुळे त्याच्याविषयी फारशी माहिती मिळू शकली नाही.

तपासाअंती ठोस काहीच लागत नसल्यामुळे पथकही हताश झाले होते. त्याच वेळेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक काब्दुले यांना एका खबऱ्याने महत्त्वपूर्ण माहिती दिली. मोहम्मद जहांगीर आलम मोहम्मद हसीबुर रहमान शेख (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे आणि तो मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील मदिना इमारतीत राहतो, अशी माहिती खबऱ्याने दिली होती. घराचा पत्ता मिळताच पथक त्याच्या घरी पोहचले; परंतु त्याच्या घराला कुलूप होते. त्याच्यासोबत राहणारा त्याचा मित्रही गावी निघून गेला होता. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळवल्याने पथकाने त्याला गावावरून बोलावून घेतले. मात्र, या खूनप्रकरणाशी त्याचा काही संबंध नसल्याचे उघड झाले. मोहम्मद याला मोबाइल सीमकार्ड सतत बदलण्याची सवय होती आणि त्याने आतापर्यंत वापरलेले क्रमांक त्याच्या मित्राकडे होते. त्याने हे सर्व क्रमांक पथकाला दिले आणि त्याआधारे पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. त्यामध्ये बंद केलेल्या एका सीमकार्डवरून त्याने नवी मुंबईमध्ये एका व्यक्तीला फोन केले होते. तौकीर आलम तजम्मुल हुसेन शेख (२८) असे त्या व्यक्तीचे नाव होते. मोहम्मद आणि तौकीर हे दोघे मित्र होते आणि दोघांवर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल होता, अशी माहिती तपासात समोर येताच पथकाने तौकीरचा शोध सुरू केला; परंतु मोहम्मदचा खून झाला, त्या दिवसापासून तो बेपत्ता होता. तौकीर हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो गावी पळून गेला होता. त्याचा माग काढत पथके गावी पोहचली; परंतु पथकाचा सुगावा लागल्याने त्याने तेथूनही पलायन केले. त्याने सर्वच मोबाइल क्रमांकही बदलले असल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. तरीही पथकाने तपासाची चिकाटी सोडली नाही. पथक तांत्रिक तपासाद्वारे त्याचा ठावठिकाणा शोधत होते. त्याचदरम्यान त्याने एका नवीन क्रमांकावरून मोठय़ा बहिणीला फोन केला. या क्रमांकाच्या आधारे पथकाने पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्याला अटक केली. घटनेच्या दिवशी तौकीर आणि मोहम्मद हे दोघे नवी मुंबईतील एका बारमध्ये दारू पीत होते. तौकीरला पैशांची गरज असल्याने त्याने मोहम्मदकडे पैसे मागितले. याच कारणावरून दोघांमध्ये तिथे भांडण झाले. त्यानंतर तौकीरने त्याला निळजे गावाजवळील रेल्वे रुळाजवळ आणले आणि तिथे डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर त्याने तेथून पलायन केले. या गुन्ह्य़ात एकही पुरावा त्याने मागे सोडला नव्हता. मात्र, एका रेल्वेच्या तिकिटावरून पोलीस त्याच्यापर्यंत अखेर पोहोचलेच आणि तो या गुन्ह्य़ात गजाआड झाला.