मुंबईकरांना पाणीपट्टी, मालमत्ता कर, गुमास्ता परवाना, यासह विविध शुल्क आपल्या मोबाइलवरून भरता येणार आहेत. नागरिकांना सहा पद्धतीने शुल्क भरता यावे अशी व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना मोबाइलवरुन पालिकेकडे तक्रारही करता येणार आहे. मात्र त्यासाठी पाच ते १० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
विविध कर भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जावे लागते. नागरिक मोठय़ा संख्येने विविध कर भरण्यासाठी या केंद्रांवर जात असल्याने तेथे प्रचंड मोठी रांग लागते. तासन्तास रांगेत उभे राहूनही काम झाले नाही तर नागरिक संतप्त होतात आणि त्यांचा रोष पालिका अधिकाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे आता पालिकेचे सर्व कर मोबाइलवरुन भरण्याची सुविधा नागरिकांना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सल्लागार म्हणून बीडब्ल्यूसी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सीडीएसी या कंपनीच्या मदतीने पालिका ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना पाणीपट्टी, मालमत्ता कर, गुमास्ता व कारखाना परवान्याचे नूतनीकरण यासह विविध कर भरता येणार आहेत. त्याचबरोबर नागरी कामांबाबतच्या तक्रारीही मोबाइलवरुन करणे शक्य होणार आहे. नागरिकांना भविष्यात नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस या सहा मार्गाद्वारे पैशाचा भरणा करता येणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे दिल्याचे अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी सांगितले.
नागरी सुविधा केंद्रांचे खासगीकरण का?
मोबाइलवरुन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा पालिकेचा मानस होता. मग पालिकेच्या विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने का घेतला, असा सवाल अनिल गलगली यांनी केला आहे. कंत्राटदारांचे ‘चांग भले’ करण्यासाठीच प्रशासनाने खासगीकरणाचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.