पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवक सर्वार्थाने प्रतिसाद देतील तेव्हा देतील परंतु मनसेने या अभियानाला साथ देत नगरसेवक विरुद्ध प्रशासन असा स्वच्छता ‘सामना’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यातिथीपासून म्हणजे १७ नोव्हेंबरपासून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी नगरसेवक विरुद्ध प्रशासन अशा स्वच्छता सामन्याला परवानगी दिली असून तसे आदेश दादरच्या सहाय्यक पालिका आयुक्तांना दिले आहेत. एकाच विभागात प्रायोगिक तत्त्वावर ही स्पर्धा होणार असून त्यात मिळणाऱ्या प्रतिसादानंतर संपूर्ण मुंबईत अशाप्रकारे स्वच्छता स्पर्धा घेण्याचा आयुक्तांचा मनोदय आहे.
मुंबई स्वच्छ करण्यात पालिकेप्रमाणेच लोकसहभाग महत्त्वाचा असून त्यादृष्टीने आयुक्त सीताराम कुंटे हे वेगवेगळ्या योजना राबविणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून व्यापक लोकजागृती करतानाच नगरसेवकांच्या सहभागातूनही विभागा-विभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
मनसेचे नगरसेवक व गटनेते संदीप देशपांडे यांनी नगरसेवक विरुद्ध सहाय्यक आयुक्त अशी एक महिनाभरासाठी स्पर्धा ठेवण्याची मागणी आयुक्त कुंटे यांच्याकडे केली. कुंटे यांनी तात्काळ या योजनेला मान्यता देऊन संदीप देशपांडे यांच्या दादर शिवाजी पार्क येथील १८५ प्रभागात स्पर्धा घेण्याचे आदेश सहाय्यक पालिका आयुक्तांना दिले. ही स्पर्धा येत्या १७ नोव्हेंबरपासून व्हावी अशी मागणी देशपांडे यांनी केली असली तरी अद्याप तारीख ठरली नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी नगरसेवक देशपांडे यांनी दोन लाख रुपयांची स्वच्छता यंत्रे, व्हॅक्युम क्लिनर अशी सामुग्री विकत घेतली असून मनसेचे कार्यकर्तेही या मोहिमेत सहभागी होणार आहेत. महिनाभर विभागातील दहा रस्ते पालिका व नगरसेवक म्हणून आम्ही निश्चित करू.
त्यानंतर तेथे महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून एका स्वतंत्र संस्थेमार्फत स्पर्धेत कोण विजयी झाला ते जाहीर करण्यात येईल असे देशपांडे यांनी सांगितले.