काळबादेवी दुर्घटनेत अग्निशमन दलातील दोन अधिकारी शहीद झाल्यामुळे माटुंगा उड्डाणपुलाखाली आयोजित करण्यात आलेल्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालिकेने रद्द केला. मात्र काँग्रेस नगरसेविकेच्या उपस्थितीत सुशोभिकरणाचा भूमिपूजन सोहळा रविवारी उरकण्यात आला आला. दरम्यान, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून भूमिपूजनाचा कार्यक्रम केल्याचा दावा काँग्रेस नगरसेविकेने केला आहे.
माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील, पारशी जिमख्यान्यासमोरील माटुंगा उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करण्याचा पालिकेचा मानस आहे. या सुशोभिकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री रामदास कदम, उपमहापौर अलका केरकर, पालिका आयुक्त अजय मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काँग्रेस नगरसेविका भूषविणार होत्या.
काळबादेवी येथील इमारतीला शनिवारी लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहीद झाल्यामुळे पालिकेने सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा सोहळा रद्द केला. मात्र या कार्यक्रमासाठी माटुंगा उड्डाणपुलाखाली उभारलेल्या व्यासपीठापासून थोडय़ा दूर अंतरावर नारळ फोडून भूमिपूजन कार्यक्रम उरकण्यात आला. यावेळी काँग्रेस नगरसेविका नयना सेठ उपस्थित होत्या.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. काही सामाजिक संघटनांनी या कामाबद्दल आपल्याला विचारणा केली तेव्हा कार्यक्रम पुढे ढकलल्याचे आपण त्यांना सांगितले. मात्र सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून भूमिपूजन कार्यक्रम उरकून घेतला. काळबादेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आपण श्रद्धांजली वाहिली, असे नगरसेविका नयना सेठ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.