दीड हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अंधेरी येथील साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र नेरकर याच्याकडे कोटय़वधीची माया सापडली आहे. त्याच्या घरातच ८० लाखांची रोख रक्कम सापडली. त्याच्या नावे अनके सदनिका आणि दुकाने असून कुटुंबीयांच्या नावाने अनेक बँक खाती आहेत. त्याच्या बेहिशेबी मालमत्तेची मोजणी सुरू आहे.
 या प्रकरणातील फिर्यादीने बसचा कर भरला नव्हता. साहाय्यक परिवहन अधिकारी राजेंद्र नेरकर याने त्यामुळे या फिर्यादीला ‘मेमो’ दिला, तसेच दोन हजार रुपये लाच देण्याची मागणी केली होती. त्यामुळे फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली. नेरकर याच्या वतीने दीड हजार रुपये स्वीकारताना जयप्रकाश साळवी याला रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्यानंतर नेरकर यालाही अटक करण्यात आली. नेरकर यांच्याकडे १९९७ मध्ये मुंबईत घेतलेला फ्लॅट, नाशिकमध्ये २०१३ साली घेतलेली दोन दुकाने आणि एक फ्लॅट आहे. मुलुंड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या लॉकरमध्ये २५ तोळे सोने आहे, तसेच त्याच्याकडे एक कार व  मोटारसायकलही आढळली आहे.