राज्यातील आर्थिक व्यवहारांत मोलाचा वाटा असणाऱ्या नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांचा ऊहापोह करून उपाय शोधण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुक्रवार, ३० जानेवारी रोजी परिषद होणार आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे प्रथमच नागरी सहकारी बँकांच्या समस्या ऐकणार आहेत. या उपक्रमाला ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ अर्थात ‘बीएसई’चे सहकार्य आहे.
नागरी सहकारी बँकांचे व्यवहार अधिक सुलभ व्हावेत या हेतूने ‘लोकसत्ता’तर्फे ही परिषद होत आहे. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे, ‘मुकुंद एम. चितळे अँड कंपनी’चे मॅनेजिंग पार्टनर मुकुंद चितळे हे या परिषदेत सहभागी होतील. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शुक्रवार, ३० जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत ही परिषद होईल.
या परिषदेत नागरी सहकारी बँकांसाठी कळीचा विषय ठरत असलेले थकीत कर्ज, शाखा विस्तारांपुढील आव्हाने, खासगी बँकांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाच्या पुरेपूर वापराचे आव्हान अशा विविध विषयांवर चर्चा होईल. तसेच त्यावर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी तोडगा सुचवतील. केंद्र व राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा ऊहापोह होईल. या परिषदेला केवळ निमंत्रितांना प्रवेश आहे.