असहिष्णुतेबद्दल होणारी चर्चा, इतिहास बदलण्याचा सुरू असलेला प्रयत्न या पाश्र्वभूमीवर देशातील नामवंत इतिहास अभ्यासक आणि इतिहासतज्ज्ञांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्या राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू व जामिया मिलिया विद्यापीठ, मुंबई, पुणे, कोल्हापूरमधील ७० नामवंत इतिहास अभ्यासक या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती परिषदेचे संयोजक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. इतिहासाचे सध्या सुरू असलेले विद्रूपीकरण किंवा इतिहास बदलण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर मुख्यत्वे या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. इतिसाह बदलण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या प्रयत्नांना पवार यांनी विरोध केला आहे. भाजप सरकारच्या काळात असहिष्णुता वाढू लागल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.