उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांची झपाटय़ाने वाढती गर्दी कमी करण्यासाठी सकाळच्या वेळेत लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून उपनगरीय रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्याच्या योजनेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आठवडय़ाभराचा कालावधी उलटूनही रेल्वेचे एकाही कूपनची विक्री झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केवळ योजना जाहीर करण्याची यादी वाढावी यासाठी घोषणा झाली असल्याचा आरोप रेल्वे संघटनाकडून केला जात आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या तीन लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना जादा रक्कम भरून कूपनद्वारे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यात कल्याण आणि ठाणे स्थानकातून प्रवाशांना थेट मुंबईला येता यावे, यासाठी लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. या उपायामुळे उपनगरीय गाडय़ांतील गर्दी काही प्रमाणात कमी होईल, असे या प्रस्तावात म्हटले होते. मात्र गाडय़ाच्या वेळा पहाटे पावणे सहा ते पावणे सात या वेळात असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सध्या या योजनेला अल्प प्रतिसाद असला तरी येत्या काही दिवसांत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल असा दावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केला.