मुंबईवर २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात सध्या अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला लष्करे तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला आरोपी करण्याला विशेष न्यायालयाने बुधवारी मंजुरी दिली. हेडलीला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करता यावे, यासाठी अमेरिकन न्यायालयाकडून परवानगी मागणारे पत्र देण्याची विनंती मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने हेडलीविरोधात समन्स जारी केले असून, त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून १० डिसेंबर रोजी सुनावणीवेळी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
डेव्हिड हेडली याला अमेरिकेतील शिकागो कोर्टाने ३५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३५ वर्षांच्या शिक्षेनंतर त्याला मुक्त करण्यात येणार आहे. मात्र त्याच्यावर आजीवन देखरेख ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या हेडली व त्याचा आणखी एक साथीदार तहव्वूर राणा याच्यावर डेन्मार्क येथील एका वृत्तपत्रावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.
हेडली याने मुंबईत झालेल्या २६ /११ च्या हल्ल्यासाठी मुंबई शहराची रेकी तयार करून हल्ल्याचा संपूर्ण कट आखला होता. अमेरिकेचा नागरिक असल्याचे सांगत त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानाची छायाचित्रे काढली, तसेच तेथील सुरक्षा यंत्रणेचा अंदाज घेतला होता. हेडली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी दहशतवादी संस्था लष्करे तैय्यबा यांच्यासाठी काम करीत होता.
याआधीही तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डेव्हिड हेडली व त्याचा सहकारी तहव्वुर राणा यांचे जाबजबाब घेण्यासाठी भारताला संधी द्यावी, अशी मागणी अमेरिकेकडे केली होती.