‘नैतिक पोलीसगिरी’च्या नावाखाली मालवणी येथील हॉटेल्स आणि रिसॉर्टवर पोलिसांनी कसे बेकायदा छापे टाकले आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कारवाईच्या नावाखाली कशी अपमानास्पद वागणूक दिली हे याचिकाकर्त्यांतर्फे गुरुवारी न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच पोलिसांचे कृत्य हे बेकायदा, घटनाबाह्य़ असण्यासोबत खासगी आयुष्यात घुसखोरी असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यावर, ‘काय चाललंय महाराष्ट्रात?’ असा सवाल न्यायालयाने सरकारी वकिलांना करून त्यापुढे ‘धक्कादायक!’ असेही म्हटले.
सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा दावा करत आणि ‘नैतिक पोलीसगिरी’च्या नावाखाली पोलिसांनी मालवणी-मढ येथील हॉटेल्स-रिसॉर्टवर छापे टाकले होते. तसेच तरुणांना अटक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. खार येथील व्यावसायिक सुमीर सभ्रवाल यांनी अ‍ॅड्. विनय राठी यांच्यामार्फत याप्रकरणी याचिका करून जोडप्यांवरील कारवाई रद्द करण्याची आणि कारवाई करणाऱ्या पोलिसांची चौकशीची आणि कारवाईची मागणी केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने पोलिसांनी कशी बेकायदा कारवाई केली आणि तरुण-तरुणींना अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगण्यात आले. खासगी आयुष्य जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. हे तरुण-तरुणी हॉटेलच्या रूममध्ये होते. परस्पर संमतीने तेथे गेले होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन केल्याचा प्रश्नच येतो कुठे, असा सवालही करण्यात आला. तसेच या प्रकरणी वादंग माजल्यावर पोलिसांनी चूकही कबूल केल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर सरकारी वकिलांना म्हणणे मांडण्यास सांगण्यापूर्वी न्यायालयाने ‘महाराष्ट्रात काय चाललंय?’, असा सवाल न्यायालयाने करताना पुढे ‘धक्कादायक..’, असेही म्हटले. त्यावर स्थानिकांच्या तक्रारीनंतर कारवाई केल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी सांगत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली. त्यांना दोन आठवडय़ाची मुदत दिली.