कुटुंब न्यायालय म्हणजे निष्पाप व्यक्तींकडून पैसे उकळण्याचे माध्यम नाही, असे सुनावत कुटुंब न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश लक्ष्मी राव यांनी १३ दिवसांत दोन लग्न करणाऱ्या महिलेला चपराक लगावली.
संबंधित महिलेचा पहिला विवाह १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाला होता. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांनी तिने दुसरा विवाह केला. मात्र, दुसऱ्या विवाहानंतर दोन महिन्यांतच ती पहिल्या पतीकडे परतली. दुसऱ्या पतीपासून घटस्फोट मिळावा यासाठी तिने अर्ज केला. आपल्याला कायमस्वरूपी नोकरी नसल्याचा दावा करीत तिने प्रतिमहिना पाच हजार रुपये देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. शिवाय दुसऱ्या पतीचे मासिक उत्पन्न १० हजार रुपये असून त्याच्यावर कोणी अवलंबूनही नाही, असा दावाही तिने ही मागणी करताना केला. दुसऱ्या पतीने मात्र तिचा हा दावा खोडून काढताना तिने आपल्याशी फसवणुकीद्वारे लग्न केल्याचा आरोप केला. ती आपल्या पहिल्या पतीसोबत राहत असल्याने तिची काळजी घेण्याची जबाबदारी त्याची आहे. त्यामुळेच हिंदू विवाह कायद्यानुसार ती घटस्फोटासाठी अर्जही करू शकत नसल्याचा दावाही दुसऱ्या पतीने केला. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी त्याने कागदपत्रे न्यायालयात सादर केली.
न्यायालयाने त्याच्या या दाव्यानंतर पत्नीला म्हणणे मांडण्यास सांगितले. परंतु न्यायालयासमोर हजर राहणे दूरच, तिने त्याबाबत काही खुलासाही केला नाही. ही बाब लक्षात घेऊन दुसऱ्या पतीने तिच्याविरुद्ध केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच १३ दिवसांत दोन लग्न करण्याच्या पत्नीच्या कृतीची दखल घेत न्यायालयाने तिची दुसऱ्या पतीकडून देखभाल खर्च मागण्याची मागणी फेटाळून लावली.
न्यायालय म्हणजे निष्पाप व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा मंच नाही आणि त्याचा त्यासाठी उपयोगही करू नये.
    -कुटुंब न्यायालय