शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी, श्याम राय आणि संजीव खन्ना या तिन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या तिघांना आज वांद्रे न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे आणखी दोन दिवस आरोपींचा ताबा मिळावा, अशी विनंती केली होती. पोलिसांची ही विनंती ग्राह्य धरत न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी, श्याम राय आणि संजीव खन्ना यांच्या पोलीस कोठडीची मुदत ७ सप्टेंबरपर्यंत वाढवली. तत्पूर्वी पोलिसांनी शुक्रवारी शीना बोराची हत्या नेमकी कशी झाली त्याचा अधिकृत खुलासा केला होता. गागोदे गावात सापडलेल्या कवटय़ा आणि हाडावंर स्पेशल सुपर इंपोजिझन प्रक्रिया झाली असून तो मृतदेह शीनाचाचा असल्याचा अहवाल नायर रुग्णालयातल्या तज्ज्ञांनी दिला होता. या चाचणीतून उलगडलेला चेहरा शीनाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. ती हाडे २३ ते २५ वर्षे वयोगटातील महिलेची असल्याचे तज्ञांनी अहवाल दिला. हा एक महत्वाचा पुरावा मानला जातोय. याशिवाय सिद्धार्थ दास, इंद्राणी आणि मिखाईल यांचे डिएनए नमुने सुद्धा या हाडांशी जुळवून पाहिले जाणार आहेत.