दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून जयदेव व उद्धव या ठाकरे बंधूंमध्ये सुरू असलेल्या वादाप्रकरणी उद्धव ठाकरे व  संजय राऊत यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी साक्षीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले.

जयदेव यांनी बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान दिले असून, त्यांनी आपल्या उलट तपासणीदरम्यान बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेत उद्धव यांनी हे इच्छापत्र आपल्याला हवे तसे तयार केल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे, तर मालमत्तेवरून ठाकरे कुटुंबीयांतील वादही न्यायालयासमोर आणला होता. शुक्रवारी याप्रकरणी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस त्यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक म्हणून उद्धव व कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांना साक्षीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले. वृत्तपत्रातून बाळासाहेब आणि जयदेव यांच्या नातेसंबंधांविषयी वृत्ते प्रसिद्ध झाली होती. त्याचमुळे वृत्तपत्राचे संपादक वा कार्यकारी संपादकांना साक्षीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्याची मागणी जयदेव यांच्यावतीने करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य करत प्रकरणाची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. या पूर्वी बाळासाहेबांवर उपचार करणारे आणि इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे डॉ. जलील परकार, शिवसेना नेते अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याशिवाय गेल्याच महिन्यात जयदेव यांची उलटतपासणी घेण्यात आली.