मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीनंतरच त्याच्या दयेच्या अर्जाबाबात राज्यपाल सी. विद्यासागर राव हे निर्णय घेणार आहेत. याकूब मेमन याने राज्यापालांकडे दयेचा अर्ज केला असून तो फेटाळून लावावा, अशी शिफारस खुद्द राज्य शासनानेच राज्यापालांना केली आहे. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्याच्या याचिका अर्जावर सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत वाट बघण्याचा निर्णय राजभवनाने घेतला असल्याचे समजते.

मान्यवर सरसावले
याकूबला फाशी देऊ नये यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सरसावले आहेत. शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी, याशिवाय मणिशंकर अय्यर, राष्ट्रवादीचे माजीद मेमन, सीताराम येचुरी, डी. राजा, एचके दुआ, पानचंद जैन, न्या. एच.एस. बेदी, पी.बी. सावंत, एच. सुरेश यांनी फाशीला विरोध केला आहे.

‘याकूबला फाशीच हवी’
सलमानने याकूब मेमनच्या फाशीचा विरोध करणे म्हणजे, एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचा बचाव करण्याचा हा प्रकार आहे. सलमान सध्या जामिनावर असताना त्याने असे वक्तव्य करणे हा न्यायव्यवस्थेचा अपमान आहे. मुंबईत बॉम्बस्फोटात शेकडो निष्पापांचे बळी घेणाऱ्या याकूबला फाशी झालीच पाहिजे, असे मत स्वामी यांनी व्यक्त केले.