मोठय़ा कामाच्या व्यापात एखादे छोटे काम विसरणे, ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. मात्र लोकल गाडीचा मोटरमन एखाद्या स्थानकावर गाडी थांबवण्यास विसरू शकतो, ही गोष्ट कोणालाही पचनी न पडणारी आहे. पण ही गोष्ट गुरुवारी दुपारी मध्य रेल्वेवर घडली आणि प्रवाशांच्या संतापाचा स्फोट झाला. अखेर मोटरमनला दिलगिरी व्यक्त करावी लागली आणि प्रकरणाला फार अनिष्ट वळण लागले नाही. कल्याणवरून दुपारी १२.५० च्या सुमारास निघालेली कल्याण ७२ या क्रमांकाची जलद लोकल पावणेदोनच्या सुमारास भायखळा येथे पोहोचते. गाडीने दादर सोडल्यावर भायखळ्याला उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ येऊन थांबले. मात्र भायखळा जवळ येऊ लागले, तरी गाडीचा वेग कमी होण्याची चिन्हे नव्हती. अखेर गाडी भायखळा स्थानकातून धडधडत निघून गेली आणि गाडीतील प्रवासी अचंबित होऊन डोळ्यासमोरून सरकरणाऱ्या स्थानकाकडे पाहत राहिले. गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचल्यानंतर घडल्या प्रकाराने संतापलेल्या प्रवाशांनी मोटरमन आर. पी. सिंग यांना घेराव घातला. गाडीला थांबा असूनही गाडी का थांबवली नाही, असा जाब प्रवाशांनी विचारला. त्यावर गाडी थांबवण्यास आपण विसरल्याचे त्यांनी सांगितले. या खुलाशाने प्रवाशांचे समाधान झाले नसले, तरी मोटरमनने माफी मागितल्यावर प्रवाशांनी फार टोकाची भूमिका घेतली नाही. मात्र रेल्वे प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.