‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आणि ध्वनी व वायुप्रदूषणापासून दूर राहा’ याबाबत दरवर्षी जागरूकता केली जाते. पण दिवाळी वर्षांतून एकदाच येते आणि फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू काही पाप, अशा आविर्भावात सर्रासपणे कर्णपटलांना दणके व हृदयाला हादरे बसेपर्यंत फटाके फोडले जातात. मात्र फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रूषणाचे माणसांप्रमाणेच प्राण्यांवरही विपरीत परिणाम होत असतात. समाजात त्याबाबत सजगता नसल्याने त्याची तीव्रता वा गांभीर्य अद्यापही कुणाच्या फारसे लक्षात आल्याचे चित्र अजूनही नाही. प्राणी व पक्षीमित्र संघटना मात्र प्रत्येक वर्षी फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण कसे प्राणी आणि पक्ष्यांच्या जीवावर बेतते, याबाबत आपल्या परीने जागरूकता करण्याचा प्रयत्न करत असतात. यंदाही या प्राणी व पक्षी मित्र संघटनांकडून ही जागरूकता करण्यात येत आहे.
‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी’ने तर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, वसई-विरार पालिकेला पत्रव्यवहार करून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत भटके व पाळीव प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याची मागणी केली आहे. सोसायटीने स्वत:ही याबाबत मोहीम सुरू केली असून, सोशल नेटवìकग साइट्सवरून त्याबाबत जागरूकता करण्यात येत आहे. दिवाळीमधील फटाक्यांच्या ध्वनिप्रदूषणामुळे भटके व पाळीव प्राणी आणि पक्ष्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे पालिकांनी स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. प्रसारमाध्यमांतून त्याबद्दल माहिती द्यावी. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही जागरूकता केली गेली तर लोक दिवाळीमध्ये फटाके वाजवून केलेला कचराही साफ करतील आणि परिसर स्वच्छ ठेवतील, असे पत्रात सूचित केले आहे. गेल्या वर्षी मुंबईत दिवाळीमध्ये एकूण २१ पक्ष्यांना ध्वनिप्रदूषणांचा फटका बसला. त्यातील काही पक्ष्यांचा बळी गेला, काही जखमी झाले, तर काही बेपत्ता झाले. यात चिमणी, कावळे, कबूतर, कुत्र्यांचा प्रामुख्याने समावेश होता. ही आकडोवारी केवळ ‘प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी’ची आहे. परंतु हा आकडा बराच मोठा असून शकतो. कारण बऱ्याचदा या प्रकारांची तक्रारही केली जात नाही.

घुबडांवर लक्ष ठेवा
दिवाळीमध्ये घुबडांची तस्करी केली जाते, हे बहुतांशी लोकांना माहीत नाही. घुबडांचा बळी दिला तर लक्ष्मी आणि समृद्धी येते या समजापोटी दिवाळीमध्ये घुबडांचा बळी दिला जातो. जादूटोणा करणाऱ्या तांत्रिकांकडून प्रामुख्याने हा प्रकार केला जातो आणि रूढी परंपरांचा आधार त्याला दिला जातो. घुबडाचा संरक्षित पक्ष्यांमध्ये समावेश होतो. त्यामुळे त्याची तस्करी गुन्हा आहे, अशी माहिती प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटीचे सुनीश सुब्रमण्यम कुंजू यांनी दिली. तसेच जर कुणी घुबडांची तस्करी करण्याच्या हेतूने ताब्यात ठेवले असेल त्याबाबत तत्काळ पोलीस, वनअधिकारी किंवा प्राणी व पक्षीमित्र संघटनांना संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दिवाळीमध्ये होणाऱ्या घुबडांच्या तस्करीविषयी वा ध्वनिप्रदूषणामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांकरिता सोसायटीच्या ९८३३४८०३८८ किंवा २५९६८३१४२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यांनी नमूद केले.

फटाक्यांमुळे प्राणी-पक्ष्यांवर होणारे परिणाम
कर्णकर्कश फटाक्यांचा माणसांना जेवढा त्रास होता. त्याच्या तुलनेत पक्षी-प्राण्यांवरील हा परिणाम अधिक असतो. हवेत उडविण्यात येणाऱ्या प्रामुख्याने झाडांखाली उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे पक्ष्यांचा जीव जातो किंवा त्यांना गंभीर दुखापत होते. तर फटाक्यांच्या आवाजामुळे भटके कुत्रे आणि अन्य प्राणी सरावैरा पळू लागतात. परिणामी बरेच जण गाडीखाली येऊन जीव गमावतात. दुसरे म्हणजे फटाके वाजवून झाल्यावर त्याचा कचरा तसाच रस्त्यावर पडून असतो. त्यामुळे बहुतांशी भटके प्राणी हे ते खातात. फटाक्यांमध्ये धातूंचा वापर करण्यात आलेला असल्याने या प्राण्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. बऱ्याचदा त्यांचा जीव जातो. त्यामुळे पालिकांनी जागरूकता म्हणून पक्षी असलेल्या जागी, झाडांखाली, प्राणीसंग्रहालय, राष्ट्रीय उद्यान अशा परिसरात फटाके वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे आवाहन प्राणी व पक्षीमित्र संघटनांनी केले आहे.