ज्या विधिमंडळात लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि वादळी चर्चेतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला हव्यात, तेथे गुरुवारी क्रिकेटज्वराचा अंमल थोडा अधिकच होता. सभागृहातील कामकाज ‘क्रिकेटज्वरात’ पार पडत असले तरी विरोधकांचे ‘लक्ष्य’ सत्ताधाऱ्यांपेक्षा आणि सत्ताधाऱ्यांचेही ‘लक्ष’ वाहिन्यांवर दिसणाऱ्या सामन्यातील धावफलकाकडे अधिक होते.
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या सामन्याचा अंमल घेऊनच आज विधिमंडळातील कामकाज सुरू झाल्याने तेथील वातावरणावर सामन्याचे सावट  दाटलेले होते. ऑस्ट्र्रेलियाची फलंदाजी सुरू असताना उभा राहणारा धावांचा डोंगर पाहूनच चिंतेचे सूर उमटू लागले होते. भारताचा संघ हा डोंगर पार करणार का, या चर्चेने तर विधान भवनातील पक्षभेदच पुसून
टाकले.
ऑस्ट्रेलियाने उभे केलेले धावांचे आव्हान पार करताना भारताला विजयश्री माळ घालेल, यासाठी काहीजण आशावादी होते. पण भारताची फलंदाजी सुरू झाली आणि एकामागून एक खेळाडू तंबूत परतू लागल्यानंतर आशेचे किरण मावळले आणि निराशेचे सूर उमटू लागले. विधिमंडळात काही उच्चपदस्थांच्या दालनात असलेल्या दूरचित्रवाणी संचापुढे गर्दी होती. मंत्र्यांसह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत तर पत्रकारांपासून राज्यभरातून आपल्या कामासाठी आलेल्या नागरिकांपर्यंत सारेच केवळ क्रिकेट सामन्याचा आस्वाद घेत होते. त्यामुळे सभागृहातील सदस्यांची उपस्थिती रोडावली होती. अर्थसंकल्पातील विविध खात्यांच्या मागण्यांवर सदस्य बोलत असताना मंत्र्यांची उपस्थिती नसल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
भारताने सामना गमावल्यावर मात्र क्रिकेटशौकिनांमध्ये निराशेचा सूर उमटला. कोणाचे काय चुकले, धावसंख्या फार काही अवघड नव्हती, याच चर्चा विधिमंडळातील गप्पांच्या फडातही रंगत राहिल्या.