जुहू, सांताक्रुझ पोलिसांकडून चार हल्लेखोरांना अटक

सांताक्रूझ येथे दौलतनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी बुधवारी सायंकाळी झालेला हल्ला हा वर्चस्ववादाच्या चढाओढीतून झाल्याचे स्पष्ट  झाले आहे. जुहू आणि सांताक्रूझ पोलिसांच्या संयुक्त  पथकाने केलेल्या तपासात अवघ्या आठ तासांत चार हल्लेखोरांना मुलुंड येथून ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्याचा सूत्रधार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अवघ्या २५ दिवसांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता.

दौलतनगर येथे दिवाण बिल्डर्स यांच्या एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी एक सुरक्षारक्षक, नदीम खत्री आणि अहमद अब्बाल अली शेख ऊर्फ बाबू कुर्ला हे संरक्षणासाठी तैनात होते. बुधवारी सायंकाळी पावणेसहा ते सहा वाजण्याच्या दरम्यान रिक्षातून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी नदीम आणि बाबू कुर्ला यांना पाहताच चॉपरने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चॉपरने नदीम आणि बाबू कुर्ला यांच्या शरीरावर असंख्य वार केले आणि तिथून पळ काढला. परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांना या हल्ल्याविषयी माहिती मिळताच या गुन्ह्य़ाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले. अवघ्या काही तासांतच जुहू हल्लेखोर मुलुंडच्या शास्त्रीनगर येथील झोपडय़ांमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने जाऊन छापा मारला त्या वेळी मोहसीन यासिन बेहलीम (३६), सचिन पवार (३४), सोनू हजारे ऊर्फ अरबाज (१९) आणि संजोग तिनघुटे (२१) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

संपूर्ण हल्ल्याचा सूत्रधार हा मोहसिन असून २००९ साली केलेल्या एका हत्येच्या गुन्ह्य़ात तो कोल्हापूर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मोहसिनने बाहेर आल्यावर नदीमला आव्हान दिले, त्याला संरक्षणाचे काम सोडून देण्यास सांगितले. मात्र नदीमने ऐकले नाही. मोहसिनने दिवाण बिल्डर्सच्या कार्यालयात याच कारणावरून तोडफोडही केले. मोहसिनवर खटला सुरू असताना ऑर्थर रोड तुरुंगात त्याची सचिन पवारशी ओळख झाली होती. पवारला ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन त्याला या हत्यांसाठी आणखी दोन माणसे जमा करण्यास सांगितले. चौघांनीही दौलतनगर येथील जागेची त्यांनी पाहणी केली आणि बुधवारी जाऊन हा हल्ला केला. चौघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.