चारकोप येथे राहणारे व्यापारी संजय शाह हे ‘त्या’ दिवशी घराबाहेर पडले. बोरिवलीत एका चष्म्याच्या दुकानात जाऊन ते कामासाठी बाहेर जाणार होते. एकदा घराबाहेर पडल्यानंतर साधारणत: सायंकाळी घरी परतत असत. त्या दिवशी दुपारी त्यांनी भावाला दूरध्वनी केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस चौकशीसाठी घेऊन चालले आहेत. रात्रीपर्यंत आपण घरी येऊ, असे त्यांनी सांगितले. परंतु ते घरी परतलेच नाहीच. त्यामुळे त्यांच्या भावाने चौकशी सुरू केली. त्यांचा मोबाइल फोन बंद होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडेही विचारणा करण्यात आली. परंतु संजय शाह नावाच्या व्यक्तीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी बोलाविले नव्हते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे शाह यांचा शोध सुरू झाला.
चिंतातुर झालेल्या त्यांची पत्नी गीता हिने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी गीताच्या मोबाइलवर संजयचा क्रमांक झळकला. परंतु समोरून दुसरीच व्यक्ती बोलत होती. तुमचे पती आमच्याकडे सुखरूप आहेत. ते जिवंत हवे असल्यास दोन कोटी रुपयांची खंडणी द्या. पोलिसांना कळविले तर पतीला ठार मारू, असा नेहमीच्या खाक्यातली धमकी मिळालेली गीता घाबरली. ती धावतच पोलीस ठाण्यात गेली. तेव्हा शाह प्रकरणातील गांभीर्य वाढले. उपायुक्त विक्रम देशमाने यांनी बांगूरनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक महेश तावडे, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, उपनिरीक्षक गणेश तोडकर, अतुल दहिफळे, हसन मुलानी यांचे पथक तयार केले. कोणताही दुवा हाती नसताना शाह यांचा शोध सुरू झाला. शाह यांची छायाचित्रे सर्वत्र पाठविण्यात आली होती. परंतु काहीच हाती लागत नव्हते. मोबाइल क्रमांकावरून त्यांचा ठावठिकाणा अधूनमधून कळत होता. कधी वसई तर कधी ठाण्यातील माजिवडे तर कधी आणखी कुठे तरी. काही काळासाठी मोबाइल फोन सुरू करून तो पुन्हा बंद केला जात होता. विविध पद्धतीने पोलिसांची चौकशी सुरू होती. अखेरीस तिसऱ्या दिवशी शाह यांचाच फोन आला की, अपहरणकर्त्यांनी त्यांना घोडबंदर रोड येथे रस्त्यावर सोडले आहे. त्यानंतर लगेचच पोलिसांनी शाह यांना ताब्यात घेऊन अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.
एका प्रकरणात चौकशी करायची आहे. आपण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून बोरिवलीतून शाह यांना गाडीत बसविण्यात आले. त्यानंतर वाटेत एका पेट्रोलपंपवर गाडीत डिझेल भरण्यात आले, असे शाह यांनी सांगितले आणि पोलिसांना तो दुवा पुरेसा होता. तात्काळ या पथकाने पेट्रोलपंपावर धाव घेतली. सुदैवाने तेथील सीसीटीव्ही फुटेज चांगल्या अवस्थेत होते. गाडीचा क्रमांक मिळाला. काही प्रमाणात गाडीत बसलेल्या संशयितांचे पुसटसे चेहरेही हाती लागले. गाडी क्रमांक मिळाल्याने आता या अपहरणकर्त्यांना पकडू असे वाटत असतानाच गाडी क्रमांक खोटा असल्याचे निष्पन्न झाले. तरीही हा खोटा क्रमांक ज्या गाडीमालकाचा होता त्याला बोलाविण्यात आले. तो वसईला राहणारा होता. बनावट क्रमांक हा साधारणत: जवळपासच्या ओळखीचा क्रमांक वापरला जातो, असे समजून संबंधित गाडी मालकाला बोलाविण्यात आले होते. आपण राहतो तेथे गाडय़ांचे शोरूम आहे. त्याशेजारीच नंबरप्लेट बनविणारा आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक तेथे गेले. संबंधित नंबरप्लेट बनविणाऱ्या व्यक्तीला गाडीचे छायाचित्र दाखविले. ती गाडी टुरिस्टची असल्याचे आणि त्याचा मालक समोरच्या इमारतीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी आपला चालक ही गाडी एक दिवसाच्या भाडय़ासाठी घेऊन गेला होता, असे सांगितले. त्यामुळे चालकाला पाचारण करण्यात आले आणि सीसीटीव्ही फुटेजशी त्याचा चेहरा मिळताजुळता होता. त्यानंतर हे अपहरण नाटय़ उघड झाले.
गाडीचालक मंगेश माने याच्यासह त्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या रुपेश लाड व राहुल ओझा या पंचविशीतील बेरोजगार तरुणांना अटक करण्यात आली. या अपहरणनाटय़ामागे अदृश्य असलेला मनोज सिंगही पकडला गेला. तोच या अपहरणामागील खरा सूत्रधार होता. संजय शाह यांच्या पत्नीच्या बहिणीचा मनोज नवरा. मंगेश, रुपेश आणि राहुल या तिघांनी अपरहण केल्यानंतर शाह यांच्याच वसईतील बंद कारखान्यात त्यांना ठेवण्यात आले. शाह यांनी हा कारखाना पाहिला नव्हता, याची मनोजला कल्पना होती. त्याचाच फायदा त्याने उठविला. परंतु पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचे कळताच त्याने शाह यांना सोडून दिले.
वसईत मनोजचे भाडय़ाचे चपलांचे दुकान आहे. त्याने वेळोवेळी शाह यांच्याकडे आर्थिक मदत मागितली होती. परंतु शाह यांनी त्यास नकार दिला होता. इतकेच नव्हे तर अपमानही केला होता. त्यामुळे धडा शिकविण्याबरोबरच पैसे उकळण्यासाठी आपण अपहरणाचा डाव आखला. सुरुवातीला १४ वेळा प्रयत्न केला. परंतु गर्दीमुळे शक्य झाले नाही. अखेरीस पोलिसांचा गणवेश घालून अपहरण करण्याचे ठरले. त्यासाठीही चार वेळा प्रयत्न केला गेला. परंतु तो यशस्वी झाला नाही. १९ व्या वेळी प्रयत्न यशस्वी झाला अन् फसलाही..

 

निशांत सरवणकर
nishant.sarwankar@expressindia.com