पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा ओसरत असल्याची टीका गेल्याच आठवडय़ात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण मोदींवर नव्हे तर सोशल मीडियावर टीका केली होती, अशी सारवासारव रविवारी विलेपार्ले येथे केली.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी यांची सोशल मीडियावरील हवा ओसरत असल्याची टीका केली होती. दोन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ‘मोदी-मोदी’चा जप करणारे आज त्यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांची हवा ओसरत चालली असल्याचे ठाकरे यांनी सोशल मीडियावरील मोदी यांच्याबाबतचा एक किस्सा सांगून स्पष्ट केले होते. मात्र या टीकेमुळे राज ठाकरे यांच्यावर भाजपनेही उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज यांनी आता या टीकेबाबत सारवासारव केली आहे. विलेपाल्रे येथे मोफत वायफाय सेवेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले असताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप त्यांनी माध्यमांवर केला. मी मोदींवर टीका केली नाही. मी फक्त एवढेच बोललो की, सोशल मीडियावरसुद्धा मोदींची खिल्ली उडवली जात आहे. मी फक्त त्यातील एक विनोद सांगितला होता. माझे वक्तव्य हे सोशल मीडियाबाबत होते, मोदींबाबत नाही. तसेच त्या मेळाव्यातील संपूर्ण भाषणाची ध्वनिचित्रफीत आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच माध्यमांनी आपल्या तोंडी काहीही घालू नये. मला जे वाटते ते मी स्पष्टपणे बोलतो. त्याबाबत मी कोणाचीही तमा बाळगत नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
उमेदवारीसाठी डोंबिवलीचे अवतण
डोंबिवली:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येणारी विधानसभेची निवडणूक डोंबिवलीतून लढवावी, असा ठराव मनसेच्या डोंबिवलीत रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज ठाकरे यांच्या उमेदवारीचा विषय पुढे आल्याने विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या डोंबिवलीतील सहा ते सात उमेदवारांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल.