दोन पिल्ले आढळली
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगरींचे वास्तव्य असल्याचा दावा येथे येणाऱ्या पर्यटकांकडून वारंवार करण्यात येत होता. मात्र, उद्यान प्रशासनाला मगर दिसून न आल्याने त्यांनी यास अधिकृतरीत्या दुजोरा दिलेला नव्हता. मात्र, रविवारी येथील नौकाविहार परिसरात नुकतीच जन्माला आलेली मगरीची दोन पिल्ले वन अधिकाऱ्यांना आढळली. मात्र, त्यांना जन्म देणाऱ्या मातेचा शोध अद्याप लागलेला नसून या पिल्लांच्या शरीरात ‘मायक्रो चिप’ बसवण्यात आल्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मगर दिसत असल्याची माहिती अनेक पर्यटक उद्यान व्यवस्थापनाला गेल्या काही दिवसांपासून देत होते. उद्यानात दररोज ‘गस्त’ घालणाऱ्या वन अधिकाऱ्यांना मगर मात्र दिसून येत नव्हती. उद्यानातील नौकाविहारात थेट मगर दिसत असल्याने येथे आलेले पर्यटक घाबरून पळ काढण्याच्या घटना घडल्या होत्या. पर्यटकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींवरून अखेर उद्यान व्यवस्थापनाने मगरींचे अस्तित्व असून त्यांच्यापासून सावध राहावे असे फलकही नौकाविहार परिसरात लावले होते. अखेरीस एका वन विभागाच्या कर्मचाऱ्यास रविवारी रात्री आठच्या सुमारास नौकाविहार परिसरात नुकतीच जन्माला आलेली मगरीची दोन पिल्ले आढळली. अवघी ११ इंच लांब असलेली व जखमा नसलेली ही पिल्ले वन विभागाने ताब्यात घेतली. तसेच सोमवारी सकाळी एक मोठी मगरदेखील या परिसरात काहींना दिसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे या मगरीला खाद्यपदार्थाचे आमिष दाखवून पकडण्यात येणार असून वन विभागाचे कर्मचारीदेखील नौकाविहार परिसरात नजर ठेवून असल्याचे समजते आहे. राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावात नैसर्गिकरीत्या मगरींचे अस्तित्व आहे.