विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर देशाचा विकास साधण्याची स्वप्ने पाहणाऱ्या देशात विज्ञानाची दैना काही थांबताना दिसत नाही. देशातील महत्त्वाची संशोधन संस्था म्हणून ओळखली जाणारी ‘काउन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च’ (सीएसआयआर) या संस्थेत दीड वर्षांपासून पूर्णवेळ महासंचालक नसून संस्थेच्या देशातील विविध भागांत असलेल्या ३८ प्रयोगशाळांपैकी १७ केंद्रांवर पूर्णवेळ संचालकही नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत.
देशातील विज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील संशोधनांना चालना मिळावी या उद्देशाने १९४२ मध्ये ‘सीएसआयआर’ची स्थापना करण्यात आली. यानंतर संस्थेत अनेक आमूलाग्र संशोधन करण्यात आले. संस्थेला वेळोवेळी चांगले नेतृत्वही मिळाले. पण संस्थेतील अनेक कामांमध्ये राजकीय अनास्थेचा प्रश्न समोर येत होता. त्यावर मात करत संस्थेचे काम सुरू होते. पण गेल्या दीड वर्षांपासून संस्थेवर पूर्णवेळ महासंचालकाची नेमणूक झालेली नाही. तेथे काम करत असलेल्या वरिष्ठ वैज्ञानिकांना पदाचा तात्पुरता कार्यभार सोपविला जातो. यामुळे संस्थेच्या अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे सूत्रांकडून समजते. याचबरोबर संस्थेशी संलग्न असलेल्या देशभरातील ३८ संशोधन प्रयोगशाळांपैकी १७ प्रयोगशाळांमध्ये पूर्णवेळ संचालक नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. याचबरोबर विविध प्रयोगशाळांमध्ये आणि मुख्य ‘सीएसआयआर’ केंद्रातही अनेक पदे रिक्त असल्याचे समजते.
संशोधक ते प्राध्यापक
देशातील ‘आयआयटी’सारख्या संस्थांमध्ये निवृत्तीचे वय ६५ करण्यात आले आहे, तर ‘सीएसआयआर’मध्ये निवृत्तीचे वय ६० आहे. यामुळे संशोधन संस्थेतील अनेक वरिष्ठ मंडळी वयाच्या पन्नाशीनंतर ‘आयआयटी’सारख्या संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होतात. यामुळे त्यांना पाच वष्रे अधिक काळ नोकरी करता येते. या कारणाने ‘सीएसआयआर’मधील अनेक पदे रिक्त होत असून ही मोठी समस्या निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून ‘सीएसआयआर’ या संस्थेतही निवृत्तीचे वय ६५ करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सीएसआयआर आणि इतर वैज्ञानिक संस्थांमध्ये जी रिक्त पदे आहेत त्याचा आढावा घेतला असून, ती पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. निवृत्तीच्या वयाच्या मुद्दय़ाबाबतही सकारात्मक विचार सुरू आहे. सध्या पूर्णवेळ महासंचालक वा संचालक नसले तरी त्या-त्या पदांची कामे योग्य पद्धतीने सुरू आहेत.
– डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री