स्थानकाबाहेर प्रशस्त उद्यान, वाहतुकीसाठी मोकळे रस्ते, अतिक्रमणमुक्त पदपथ आणि पर्यटन गॅलरी

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये निवड झालेल्या १० ठिकाणांमध्ये स्थान मिळविणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि आसपासच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी पालिकेने आराखडा तयार केला असून येत्या वर्षभरात हा परिसर कात टाकणार आहे. वाहतुकीसाठी मोकळे रस्ते, पादचाऱ्यांसाठी अतिक्रमणमुक्त पदपथ आणि विशेष म्हणजे देशी-विदेशी पर्यटकांसाठी पर्यटनस्नेही परिसर, पुरातन वास्तूला शोभेल असा आणि बेस्टचा इतिहास चित्रातून उलगडणारा बस थांबा, पुरातन वास्तूंची छायाचित्रे टिपण्यासाठी गॅलरी असे सीएसटीचे रुपडे भविष्यात पाहावयास मिळणार आहेत. देशातील सुशोभित ठिकाणांच्या यादीत सीएसटी परिसराला आघाडीचे स्थान मिळावे यासाठी पालिकेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने देशभरातील पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे अशा १० ठिकाणांची निवड केली असून ही ठिकाणी सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सीएसटीबरोबरच देशातील प्रमुख पर्यटन-धार्मिक स्थळांचा समावेश  आहे. जागतिक कीर्तीच्या या पर्यटनस्थळांमध्ये सीएसटीला स्थान मिळाले असल्याने पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाचे गुरुवारी दिल्लीत सादरीकरण करण्यात येईल.

या आराखडय़ानुसार पहिल्या तीन महिन्यांत सीएसटीभोवतालच्या ५० मीटर, सहा महिन्यांत १०० मीटर आणि वर्षभरात ५०० मीटर क्षेत्राचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी रस्ते आणि पदपथ सुटसुटीत करण्यात येणार आहे.  या सुशोभीकरणाच्या कामात पालिकेने इंडियन नॅशनल स्ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची मदत घेण्यात आली आहे.

  • सीएसटीशेजारी असलेल्या भाटिया बागेचे सुशोभीकरण. बागेतूनच पलीकडे जाण्यासाठी रस्ता. बागेतून बाहेर पडताच भुयारी पादचारी मार्ग.
  • सेंट जॉर्ज गल्ली, भाटिया बाग, डी. एन. रोडवरील अधिकृत फेरीवाल्यांचे अन्यत्र स्थलांतर करणार.
  • सर्वच पदपथांवर बेसॉल्ट अथवा ब्लू स्टोन बसवून कडेला लोखंडी कठडे उभारणार.
  • परिसरातील रंगसंगतीमध्ये एकसमानता आणण्यावर भर.
  • डी. एन. रोडवरील पादचारी पुलाचा कायापालट.
  • टर्मिनस, पालिका मुख्यालयाच्या इमारतींना पुरातन वास्तूंची छायाचित्रे टिपता यावी म्हणून पालिका मुख्यालयाच्या समोरील ज्येष्ठ समाजसेवक फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्याजवळ एक गॅलरी.
  • सीएसटीलगतचे सर्व बस थांबे हटवून स्वतंत्र सीएसटी आगाराची निर्मिती.
  • डी. एन. रोडवर सीएसटी आगाराबाहेर पुरातन वास्तूला शोभेल असा बस थांबा उभारणार. येथे जुन्या बसगाडीची प्रतिकृती उभारून बेस्टच्या इतिहासाचे चित्र रूपात कायमस्वरूपी प्रदर्शन.