मार्गाचे दुपदरीकरण; लोकलही धावणार; ‘एमयूटीपी-३’च्या प्रकल्पाचा मुंबईकरांना फायदा

उपनगरीय रेल्वेमार्गावरील सर्वात लांबच्या प्रवासांपैकी सीएसटी ते कर्जत या प्रवासासाठी भविष्यात वेळेची बचत होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या एमयूटीपी-३ योजनेअंतर्गत पनवेल-कर्जत या मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. त्यानंतर सध्या कल्याणमार्गे जाणाऱ्या कर्जत गाडय़ांपैकी काही गाडय़ा सीएसटी-पनवेल-कर्जत या मार्गावरून चालवण्यात येतील. कल्याणपेक्षा हे अंतर २८ किलोमीटरने कमी असून त्यामुळे प्रवासातील ३० ते ३५ मिनिटे वाचणार आहेत.

मध्य रेल्वेवर सध्या सीएसटी ते कर्जत या ११६ किलोमीटरच्या अंतरात २१ फेऱ्या धावतात. या २१ फेऱ्यांपैकी ५ फेऱ्या धिम्या असून उर्वरित १६ जलद व अर्धजलद आहेत. धिम्या मार्गावरून सीएसटी ते कर्जत हे अंतर पार करण्यासाठी २ तास १८ मिनिटे लागतात. तर जलद गाडीने हे अंतर १ तास ५३ मिनिटांत कापले जाते. कर्जत येथील नव्या गृहसंकुलांमुळे येथील प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे येथून भविष्यात आणखी सेवा सुरू करण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.

फायदा काय?

आता एमयूटीपी-३ योजनेअंतर्गत पनवेल-कर्जत या सध्याच्या मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. या २३ किलोमीटरच्या मार्गासाठी २६१८ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. पनवेल-चौक-कर्जत अशा या मार्गासाठी रेल्वेने याआधीही सर्वेक्षण केले होते. या प्रकल्पासाठी  जास्त जागा अधिग्रहित करण्याची गरज नसल्याने तो ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल, असे एमआरव्हीसीचे अधिकारी  सांगतात.   हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर लोकल गाडय़ा चालवण्याचा विचार  रेल्वे करीत आहे. पनवेल ते सीएसटी हे अंतर ६५ किमी आहे. त्यापुढे २३ किलोमीटर म्हणजेच ८८ किमी अंतरावर कर्जत येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे अंतर २८ किलोमीटरने कमी होणार आहे.  प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ तब्बल ३० मिनिटांनी कमी होणार असल्याचे या प्रकल्पानुसार सांगितले जात आहे. त्यामुळे   कर्जत मुंबईच्या आणखी जवळ येणार आहे.