१८ ते २१ डिसेंबरदरम्यान  पवईत सांस्कृतिक महोत्सव

निळाशार समुद्र.. त्याला लागून उभी राहिलेली वाळूची मैदाने.. अशा हवाई देशांमध्ये हमखास दिसणारे चित्र आजपासून (शुक्रवार) रंगलेल्या ‘मूड इंडिगो’ या पवईतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक महोत्सवात दिसणार आहे.

देशातील सर्वाधिक मोठा सांस्कृतिक महोत्सव असा लौकिक असलेल्या मूड इंडिगोची यंदाची थीमच मुळी ‘अ हवाईयन एस्कॅपेड’ अशी असणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधीलच नव्हे तर विविध देशीविदेशी कलाकारांच्या कलेचे सादरीकरण अनुभवयाला मिळते. १८ ते २१ डिसेंबरदरम्यान संस्थेच्या पवई येथील विस्तीर्ण संकुलात हा महोत्सव रंगणार आहे. यात दर्शनी भागातच वाळूचा किल्ला उभारण्यात येणार आहे. याशिवाय विविध साहित्यापासून बनविलेली शिल्पे दर्शकांचे लक्ष वेधून घेतील. याशिवाय थीमला अनुसरून हवाई देशांमधील खाद्य, पेहराव, नृत्य आदी विविध पैलूंचे दर्शन या ठिकाणी केले जाणार आहे.याशिवाय पेंटबॉल, गनपाइंट टेक्नॉलॉजी, झोर्बिग आदी थरारक खेळांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येईल. रात्री नृत्य, संगीत यांची मेजवानी चाखायला मिळेल. शान, लकी अली हे कलाकार आपल्या संगीतावर विद्यार्थ्यांना थिरकायला लावतील. या वेळी महोत्सवाच्या निमित्ताने अवयवदानाबाबत जाणीव जागृती करण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवावर सुरक्षेच्या कारणास्तव अत्याधुनिक क्वॉडकॉप्टरच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.