पुरेशा नोटांच्या अभावी पगारदारांचे पुढील दोन आठवडेही रांगेचे?

निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर गुरुवारी आलेल्या पहिल्या मासिक पगाराच्या दिवशी बँक खात्यात जमा रक्कम काढण्यासाठी नोकरदार आणि निवृत्तांना पुढचे दोन आठवडे कष्टाचेच जाणार असल्याचे संकेत आहेत. याचे कारण प्रत्येक बँकेला नव्या छापलेल्या नोटा रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात उपलब्धच झालेल्या नाहीत. सर्वाधिक वेतनखाती ज्या बँकेची आहेत त्यांना प्राधान्याने नोटा देण्याचे धोरण रिझव्‍‌र्ह बँकेने आखल्याने अन्य बँकांच्या ग्राहकांची परवड होण्याचीच चिन्हे आहेत.

परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, अशी आश्वासने दिली जात असताना अनेक एटीएम केंद्रे ८ नोव्हेंबरपासून बंदच आहेत. जी एटीएम केंद्रे कशीबशी सुरू आहेत तिथेही पगाराच्या दिवशी पैसे काढण्यासाठी गर्दी होणार या शक्यतेने रविवारपासूनच रांगा लागत आहेत. त्या एटीएमवरील लोकांची गर्दी ६० ते ७० टक्क्यांनी वाढल्याचे दिसले आहे. प्रत्यक्ष गुरुवारपासून तर या गर्दीत लक्षणीय वाढ होण्याचीच शक्यता आहे.

छापून झालेल्या नव्या चलनी नोटा बँकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने एक आराखडा तयार केल्याचे समजते. रिझव्‍‌र्ह बँकेचे एक विशेष कृतिदल डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांच्या देखरेखीखाली बँकांना जाणवणाऱ्या नोटांच्या चणचणीकडे पुढील दोन आठवडे लक्ष ठेवणार असल्याचे समजते. गेल्या काही महिन्यांमध्ये विशिष्ट बँका व त्यांच्या शाखा व क्षेत्रांतून महिनारंभी काढल्या जाणाऱ्या रकमेचा अंदाज घेऊन आणि ज्या बँका व शाखांमध्ये नोकरदार- निवृत्तिवेतनधारकांची खाती सर्वाधिक आहेत, त्यांनाच नोटा उपलब्ध करण्याचे रिझव्‍‌र्ह बँकेचे धोरण असल्याचे मुंबईतील एका बँक अधिकाऱ्यानेच सांगितले. ज्या निवृत्तिवेतनधारकांची खाती टपाल विभागात आहेत त्यांच्याबाबतचे धोरण मात्र स्पष्ट झालेले नाही.

गेले आठवडाभर रिझव्‍‌र्ह बँकेकडे पुरेसा चलनपुरवठा होत नसल्याचा आमचा तगादा सुरू आहे. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकाही झाल्या. परंतु पुढील निदान दोन आठवडे नोटांच्या पुरवठय़ाबाबत स्थितीत सुधारणा होणार नसल्याचे आपल्याला सांगण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने नाव गोपनीय राखण्याच्या अटीवर सांगितले.

सामान्यपणे दक्षिण मुंबई आणि कार्यालयीन संकुले असलेल्या परिसरातील बँकांच्या शाखांना सामान्य पुरवठय़ापेक्षा १०-२० टक्के अधिक नोटांचा पुरवठा केला जाणे अपेक्षित आहे. मात्र तसा पुरवठा होण्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.

रिझव्‍‌र्ह बँकेची गोपनीयता!

रिझव्‍‌र्ह बँकेकडून ५०० आणि २००० रुपये मूल्याच्या नवीन नोटांची छपाई किती झाली आणि बँकांना किती नोटा वितरित करण्यात आल्या याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

जनधनाला १० हजारांची मर्यादा

पंतप्रधान जनधन खात्यातील निधीचा वाढता ओघ चर्चेचा विषय बनला असतानाच, अशा बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठी गुरुवारपासून मर्यादा आली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने अशा खात्यातून महिन्याला दहा हजार रुपयेच काढण्याची खातेदारांना परवानगी दिली आहे.

एटीएम कॅशलेस!

अनेक एटीएम पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी आल्यापासून आजतागायत सुरूच होऊ शकलेली नाहीत. तर नव्या आकारातील ५०० आणि २,००० रुपये मूल्याच्या नोटांसाठी अनेक बँकांची एटीएम यंत्रे अद्याप संरचित केली गेलेली नाहीत. स्टेट बँकेसह काही बडय़ा बँकांची निवडक एटीएम यंत्रेच केवळ संरचित झाली असून, अन्यत्र एटीएममधून १०० रुपयांच्या नोटांचे वितरण उपलब्धतेनुसार सुरू असे. परंतु गेल्या तीन दिवसांत  गर्दीमुळे त्या एटीएममध्येही ठणठणाट आहे.