बहुतांश एटीएम कोरडीच; दैनंदिन खर्च भागवतानाही कसरत

निश्चलनीकरणामुळे एकीकडे बँक व एटीएम केंद्रांबाहेर भल्या मोठय़ा रांगा लावून तुटपुंजी रक्कम मिळत असल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले असतानाच दुसरीकडे शनिवारपासून सोमवापर्यंत सलग तीन दिवस बँका बंद असल्याने सामान्यांच्या पोटात गोळाच आला आहे. बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याने आणि काही एटीएममध्ये केवळ दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे. त्यामुळे या तीन दिवसांत पैसे काढण्याची कोणतीच सोय नसल्याने रुग्णालये, आवश्यक वस्तू आदींचा खर्च भागवताना सामान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

निश्चलनीकरणानंतर एक महिना होऊन गेला असला तरी देशाची विस्कटलेली आर्थिक घडी अद्याप सुधारण्याचे चिन्ह दिसत नाही. राज्यासह मुंबईतही हे चित्र असून अजूनही शहरातील एटीएम केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नसून अनेक एटीएम केंद्रांबाहेर ‘बंद’ असा फलक लावलेला पाहावयास मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडत असतानाच सुट्टय़ांमुळे शनिवारपासून सोमवार १२ डिसेंबपर्यंत तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने पैसे काढण्यासाठी ग्राहक धावपळ करत आहेत. शनिवार व रविवार सुट्टी म्हणून व सोमवारी ईद-ए-मिलादनिमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. यात शनिवारी या सुट्टीचा पहिला दिवस असतानाच अनेकांनी मिळेल त्या एटीएम केंद्राबाहेर उभे राहून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएममधील अपुऱ्या चलनाअभावी किंवा फक्त दोन हजारच्या नोटा मिळत असल्याने अनेकांना निराश व्हावे लागले. कारण वस्तू खरेदी करण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट घेऊन गेल्यानंतर सुट्टे पैसे मिळत नसल्याने त्या न वापरण्याचाच निर्णय काहींनी घेतल्याचे दिसते आहे. तसेच तीन दिवस बँका बंद असल्याने सुट्टे पैसे मिळणारच नसून दोन हजारांची नोट काय कामाची? अशी प्रतिक्रिया बँकांच्या बाहेर रांगेत उभे असलेले नागरिक व्यक्त करत होते. तर, अनेकांना दोन-दोन तास रांगेत उभे राहून पैसे न मिळाल्याने हात हलवत घरी परतावे लागल्याचे दिसले. दरम्यान, खासगी क्षेत्रातील काही बँकांनी आपले अंतर्गत हिशेब व व्यवहाराच्या कामासाठी या दिवसात बँका उघडय़ा ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या सामान्यांना मात्र प्रवेश नसणार आहे.

सामान्यांना लाभ नाहीच..

मुंबईसह देशात प्राप्तिकर विभाग व पोलीस अनेक ठिकाणी धाडी टाकून नव्या चलनातील ८५ लाखांपासून १५० कोटींची रक्कम पकडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांनी यावर राग व्यक्त केला असून आम्हाला एका आठवडय़ात २४ हजार रुपये काढण्यासाठी किमान दहा तासांहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र काही बडय़ा धेंडांकडे नव्या चलनातील नोटा कोटी रुपयांमध्ये उपलब्ध झाल्याने या निर्णयाचा सामान्यांना नेमका लाभ तो काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.