निवडणुका संपल्याने नोटापुरवठय़ात कपातीची शक्यता

राज्यातील दहा महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांचे निकाल आज गुरुवारी लागल्यानंतर सत्तेसाठीचे हिशेब मांडण्यात राजकीय मंडळी गुंतणार असली तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र पुन्हा एकदा चलनटंचाईचेच हिशेब करण्याची वेळ येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

देशात, तसेच राज्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत तेथे तेथे रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्वारे चलनाचा ओघ मोठय़ा प्रमाणावर वळवण्यात आला. राज्यात दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या सर्व ठिकाणी निवडणूक काळात चलनटंचाई फारशी जाणवली नव्हती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता रिझव्‍‌र्ह बँकेकडील चलनाचा ओघ आटण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास नागरिकांना पुन्हा एकदा एटीएमपुढे, बँकांपुढे रांगेत उभे राहावे लागेल.

अनावश्यक पैसे काढू नका

देशातील काही ठिकाणांहून एटीएममध्ये नोटाटंचाई असल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी, ‘काही जण नको इतके पैसे काढत असल्याने इतरांना त्याचा त्रास होत आहे’, असा पवित्रा बुधवारी घेतला! ‘जेवढय़ा पैशांची आवश्यकता आहे तेवढेच काढा. अनावश्यक पैसे काढू नका’, असे आवाहन करणारे ट्वीटच त्यांनी केले. त्याचसोबत, ‘एक हजारच्या नोटा चलनात आणण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

एटीएममधून दोन हजाराच्या बनावट नोटा!

नवी दिल्ली : दोन हजाराच्या नोटेवर ‘भारतीय रिझव्‍‌र्ह बँके’ ऐवजी एका बाजूला ‘भारतीय मनोरंजन बँक’ तर दुसऱ्या बाजूला ‘चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया’ असे छापलेले, ‘दोन हजार रुपये’ ऐवजी ‘दोन हजार कुपन्स’ असे लिहिलेले आणि त्यावर ‘पीके’ चित्रपटाचा शिक्का.. अशा एक नाही तर चार नोटा चक्क स्टेट बँकेच्या एटीएममधून एका ग्राहकाच्या हाती आल्या!  रोहितकुमार या तरुणाने दिल्लीतील संगम विहार येथे स्टेट बँकेच्या एटीएममधून आठ हजार रुपयांची रक्कम काढली. तेव्हा त्याच्या हातात दोन हजाराच्या चार बनावट नोटा पडल्या. एटीएममध्ये बनावट नोटा कशा आल्या, याचा तपास केला जात असल्याचे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले.

अर्थवाढीचा दर..

नोटाबंदीच्या निर्णयाला सुमारे साडेतीन महिने झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, ‘देशाच्या अर्थवाढीचा दर चालू आर्थिक वर्षांच्या अखेरच्या तिमाहीत ६.४ इतका असेल’ असा अंदाज भारतीय स्टेट बँकेने व्यक्त केला आहे. त्याच वेळी, ‘चालू आर्थिक वर्षांतील अर्थवाढीचा दर ६.६ टक्के इतका राहील’ असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. ‘‘नोटाबंदीचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असला तरी तो तात्पुरता असून, पुढील वर्षांत अर्थवाढीचा वेग आठ टक्क्यांवर जाऊ शकतो’ असाही नाणेनिधीचा अदमास आहे, तर ‘नोटाबंदीमुळे बसलेल्या फटक्याची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी स्थिती पूर्ववत होण्यास बराच कालावधी जावा लागेल,’ असे एस अँड पी या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.