यंत्रणेला न जुमानता राष्ट्रवादीच्या नेत्याची दादागिरी; तहसीलदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल, मात्र अटक नाही

पर्यावरण संरक्षणाचे कायदे धाब्यावर बसवून आपल्या शाळेच्या बसगाडय़ा उभ्या करण्यासाठी तिवरांची कत्तल करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनदेखील या जागेवर बांधकाम सुरूच आहे. हरितपट्टा असलेल्या या भूखंडावर बांधकामास मनाई असतानाही अंधेरीचे तहसीलदार तसेच पोलिसांना न जुमानता वर्मा यांच्याकडून या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे आता अंधेरी तहसीलदारांनी संबंधितांवर मुंबई प्रादेशिक नगररचना कायद्याअंतर्गत (एमआरटीपी) कारवाई करण्यासाठी महापालिकेला पत्र लिहिले आहे.

अंधेरीतील लोखंडवाला संकुल येथे वर्मा यांच्या मालकीची जानकीदेवी पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या शाळेशेजारी तब्बल साडेतीनशे एकर इतके तिवरांचे जंगल आहे. यापैकी म्हाडाच्या मालकीच्या भूखंडावर असलेले अतिक्रमण हटवून वर्मा यांनी हा भूखंड आपल्या शाळेसाठी भाडेतत्त्वावर मिळविला. हा भूखंड हरित पट्टा असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यावर बंदी आहे; परंतु वर्मा यांनी या भूखंडावरील धूळ शाळेत येते, असा दावा करीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू केले. वास्तविक पेव्हर ब्लॉक बसवून या भूखंडाचा शाळेच्या बसेस उभ्या करण्यासाठी वापर करण्याचा वर्मा आणि शाळा व्यवस्थापनाचा हेतू आहे. या भूखंडावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू झाले तेव्हा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केली तसेच वसरेवा पोलीस ठाण्यालाही याबाबत कळवले. मात्र, पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. ‘लोकसत्ता मुंबई’नेही या संदर्भातील वृत्त दोन दिवसांपूर्वीच दिले होते.

तिवरांपासून ५० मीटर अंतरावर कुठलेही बांधकाम करणे म्हणजे पर्यावरण कायद्याचा भंग असल्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे पोलिसांचे लक्ष वेधल्यानंतर अंधेरी तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी रोहिदास तरे यांच्या तक्रारीच्या आधारे वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अजामीनपात्र असून त्यात सात वर्षे सजा आणि एक लाख दंड अशी शिक्षेची तरतूद आहे; परंतु गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. ‘‘आम्ही कुदळ आणि फावडा घेऊन पेव्हर ब्लॉक काढून टाकू का, असा उर्मट सवाल वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण काळे तसेच निरीक्षक पाटील करीत आहेत,’’ असा आरोप भाजपचे मुंबई सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी केला.

दरम्यान, या भूखंडावर तिवरे नव्हती, असा खुलासा नरेंद्र वर्मा यांनी केला आहे. ‘‘येथील अतिक्रमणे हटवून आम्ही हा भूखंड संरक्षित केला. त्यानंतर म्हाडाने तो वापरण्यासाठी दिला,’’ असे वर्मा यांनी म्हटले आहे; परंतु गुप्ता यांनी हा दावा फेटाळून लावला. या प्रकरणी पाठपुरावा करणारे फ्रेंड्स ऑफ एन्व्हायरन्मेन्टचे सुमेश लेखी तसेच सीमा साहू यांच्याकडे या भूखंडाची जुनी छायाचित्रे आहेत. त्यात तिवरांची झाडे स्पष्ट दिसत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.