संपूर्ण देशात सायबर गुन्हे वाढत असून त्याचा सर्वाधिक धोका बँकांना असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सायबर गुन्ह्य़ांसंदर्भात मुंबईत आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गुन्हेगाराची माहिती, त्यांची कार्यपद्धती एकाच क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या ‘कोलॅबोरेटिव्ह ऑनलाइन इन्व्हेस्टिगेशन नेटवर्क’ (कॉईन) या प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गृह विभाग, मुंबई पोलीस आणि एशियन स्कूल ऑफ सायबर लॉ यांच्या वतीने या दोनदिवसीय सायबर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सेकंदासेकंदाला सायबर गुन्हे घडत असून पोलिसांपुढे आव्हान असल्याचे फडणवीस म्हणाले. सतत सायबर हल्ले होत असून बँका या सायबर हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य असणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. हे हल्ले रोखण्यासाठी पोलिसांनी तसेच नागरिकांनीही सायबर साक्षर असण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. गृह सचिव के. पी. बक्षी यांनी कार्याचा आढावा घेताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या वेळी ‘कोलॅबोरेटिव्ह ऑनलाइन इन्व्हेस्टिगेशन नेटवर्क’ म्हणजेच कॉईन या प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सर्व गुन्हेगारांची एकत्रित माहिती, त्यांची गुन्ह्य़ांची पद्धत आदी माहिती त्यात असल्यामुळे एका क्लिकवर ते शोधणे पोलिसांना उपयुक्त ठरणार आहे.