टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून गच्छंती झालेल्या सायरस मिस्त्री यांनी  पत्राद्वारे केलेल्या आरोपांचे पडसाद गुरूवारी शेअर बाजारात उमटताना दिसत आहेत. आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा गडगडले. यापूर्वी सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून दूर केल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मंगळवारीही समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सायरस मिस्त्रींच्या आरोपांमुळे आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय येत आहे. टाटा समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी घसरले आहेत. याचा परिणाम मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारावरही दिसत आहे. आज सकाळी भांडवली बाजाराच्या व्यवहारांना सुरूवात झाल्यानंतर सेन्सेक्स १०० तर निफ्टी तब्बल ३० अंशांनी खाली आला होता. त्यानंतर बाजार काहीप्रमाणात सावरला असला तरी टाटा समूहाच्या समभागांमधील घसरण कायम आहे.
टाटा समूहातील टाटा मोटर्स, टाटा स्टील युरोप, टाटा पॉवर मुंद्रा, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस व इंडियन हॉटेल्स या पाच कंपन्यांचा एक लाख ७४ हजार कोटी रुपये इतका भुर्दंड भार हा समूहाच्या निव्वळ मालमत्तेएवढा आहे, असे त्यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले. या पाचपैकी टाटा मोटर्सचा नॅनो प्रकल्प, टाटा टेलि सव्‍‌र्हिसेसमधील टाटा डोकोमो व्यवसाय गुंडाळला अथवा विकला असता तर आजचे नुकसान टळले असते, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे. समूहाच्या नागरी हवाई व्यवसाय व्यवहारातही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

टाटा समूहात कंपनी सुशासनाचा अभाव

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निष्कासित करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी अखेर बुधवारी प्रथमच हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांना लक्ष्य करत आरोपांची लडच लावली. समूहात कंपनी सुशासनाचा अभाव असून आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या समूहातील पाच कंपन्यांमुळे एक लाख ७४ हजार कोटी रुपयांचा भुर्दंड पडू शकतो, असा इशारा दिला. आपल्याला ‘कर्जबुडव्या’ अध्यक्ष म्हणूनच कमी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना सोमवारी सायंकाळी काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांनी समूहाच्या संचालक मंडळाच्या अन्य सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये थेट रतन टाटा आणि टाटा समूहावरच शाब्दिक हल्ला केला. ‘गोपनीय’ या शीर्षकासह लिहिलेले हे पत्रच बुधवारपासून समाजमाध्यमांतून फिरू लागले. हे पाच पानी पत्र टाटा सन्समध्ये ६६ टक्के हिस्सा असलेल्या टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांनाही पाठविण्यात आले असून त्यावर मिस्त्री यांनी कोणतेही पदनाम न टाकता केवळ आपले नाव लिहिले आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतरही मिस्त्री हे सध्या समूहातील एक संचालक म्हणून कायम आहेत.