फेरीवाल्यांच्या विरोधात दादरवासीय रस्त्यावर

‘मुंबई नाही फेरीवाल्यांची, ती आहे मुंबईकरांची’, ‘मुंबईचे पदपथ गेले कुठे’ अशा घोषणा देत बुधवारी दादरवासीय रस्त्यावर उतरले. ‘फ्री अ बिलियन्स’ संस्थेने फेरीवाल्यांविरोधात आयोजित केलेल्या या शांततापूर्ण आंदोलनात फ्रेंड्स ऑफ दादर, युवाशक्ती प्रतिष्ठान आदी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

दादर येथील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला असून या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव महापालिका प्रशासनाला व्हावी म्हणून महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. ‘शर्म करो कुछ तो काम करो’ या मोहिमेअंतर्गत हा लढा सुरू करण्यात आला आहे. विभाग कार्यालयाच्या बाहेर पदपथावर कार्यकर्त्यांनी ‘प्रतीकात्मक’दुकान मांडून प्रशासन आणि फेरीवाल्यांचा निषेध केला. दोन तासांच्या आंदोलनानंतर सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी ‘जी उत्तर’ विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांच्याकडे निवेदन सादर केले. फेरीवाले आणि अन्य नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन तात्काळ कार्यवाही सुरू करेल, त्यासाठी दादरच्या पोलिसांचेही सहकार्य घेतले जाईल, असे आश्वासन बिरादार यांनी दिले. पालिकेच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सहभागी संघटना २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा महापालिका साहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या बैठकीला नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींबरोबरच मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव उपस्थित होते.