दादर पश्चिम रेल्वे मार्गालगतच्या फूल बाजाराजवळील पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडल्याने प्रवाशांना दररोज गर्दीचा सामना करावा लागत आहे.

दादर फूल बाजारातून दादर पूर्वेकडे जाण्यासाठीचा सार्वजनिक पूल दुरुस्तीच्या कारणामुळे अनेक महिने बंद ठेवण्यात आला आहे. हजारो प्रवासी या पुलावरून दररोज ये-जा करीत असत. पूल मोडकळीस आल्यामुळे महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पुलाच्या कामामुळे अरुंद  जागेतून वाट काढत प्रवाशांना प्रवाशांसाठी रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. त्यात या अरुंद जागेतही फेरीवाले बस्तान बसवून असल्याने प्रवाशांच्या हालात भरच पडते.

पुलाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी गर्दीच्या वेळेस वाट काढण्याकरिता १०-१५ मिनिटे लागतात. यात सर्वाधिक हाल वृद्ध, लहान मुले आणि महिलांचे होतात.

पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे आवश्यक होते. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी महापालिकेने पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. परंतु अजुनही पुलाचे काम सुरूच आहे. गर्दीच्या वेळेस येथून मार्ग काढताना कठीण होते. आमची तर फारच कुचंबणा होते, असे दिशा गावकर यांनी सांगितले.

जलवाहिनीचा अडथळा

दिवसा प्रवाशांच्या गर्दीमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही. त्यामुळे बहुतांश काम रात्रीच्या वेळेस करावे लागते. एका जलवाहिनीमुळे कामात अडथळा निर्माण होत आहे. ही जलवाहिनी दुसरीकडून वळविण्यात येणार आहे. जलवाहिनी वळविल्यावर कामाला वेग येईल आणि काही दिवसांतच काम पूर्ण होऊन पूल नागरिकांसाठी खुला केला जाईल, असे पालिकेचे अभियंता एस. ओ. कोरी यांनी सांगितले.