स्वातंत्र्य दिन व गोपाळकाल्यासाठी संयुक्त तयारी

यंदा प्रथमच दहीहंडी व स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आल्यामुळे मुंबईकरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या विशेष दिनानिमित्ताने गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या तयारीबरोबर स्वातंत्र्य दिनाची विशेष तयारी सुरू केली असून ध्वजारोहणानंतरच हंडय़ांची मोहीम फत्ते करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गोविंदा पथकांची तयारी जोमाने सुरू झाली असून उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरावरील र्निबध काढल्यामुळे गोविंदा पथकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आठवडय़ाभरापासून सर्व गोविंदा पथकाने अधिक जोमाने सरावाला सुरुवात केली असून आयोजकांच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन व दहीहंडी एकाच दिवशी आल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्य दिन व दहीहंडी या दोन्ही उत्सवानिमित्ताने मुंबईत जल्लोषाचे वातावरण असते. दर वर्षी सार्वजनिक मंडळे राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करतात. व सकाळी सर्व गोविंदा तिरंग्याला सलामी देण्यासाठी एकत्र जमतात. दहीहंडी दिवशी गोविंदा पथके सकाळी घराबाहेर पडतात. मात्र याच दिवशी स्वातंत्र्य दिन असल्याने सोमवारी सकाळ लवकर उठून ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडतील, असे जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.

यंदा दहीहंडीच्या उंचीवर र्निबध नसल्यामुळे ‘माझगांव ताडवाडी गोविंदा पथका’चे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी आनंद व्यक्त केला. सध्या या पथकात ५०० ते ६०० मुले असून २००८ मध्ये या मंडळाने नऊ थरांचा विक्रम केला होता. या वर्षी या विक्रमाची पुनरावृत्ती व्हावी यासाठी जोमाने सराव करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. मात्र यंदा उत्सवाचा डबल धमाका असेल, असे पाटील यांनी सांगितले.

भटवाडीतील ‘श्रीकृष्णा क्रीडा मंडळात’ ३०० मुले व १५० मुलींचे गोविंदा पथक आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व तयारी करण्यात आली असून न्यायालयाच्या निर्णयानंतर सरावाला उत्साह आला आहे. रात्री ८ वाजता सुरू होणारा सराव १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतो. आणि सर्व गोविंदा आवर्जून दहीहंडीची वाट पाहत आहेत. यंदा मात्र स्वातंत्र्य दिन व दहीहंडी एकत्र आल्याने मंडळातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे श्रीकृष्णा क्रीडा मंडळाचे अमेय महाडे यांनी सांगितले.