डीजेचा ढणढणाट, राजकारण्यांची चमकोगिरी आणि मादक नाचगाण्याच्या धुंदीत हरवत चाललेल्या या सणामुळे सामान्यांच्या कानाबरोबरच जणू मनेही बधिर झाली आहेत. घरात साधे खेळताना पडणाऱ्या मुलाला पाहिले की काळजात चर्र होते. पण गोविंदा पथकांच्या सर्वात वरच्या थरावर पाच-सात वर्षांची चिमुरडी मुले सलामी देत होती. मनोरा पडल्यानंतर खाली कोसळणाऱ्या या कोवळ्या शरीरांशी जणू कुणालाच काही देणेघेणे नव्हते. माणुसकीला पायदळी तुडवत दहीहंडीचा उत्सव साजरा होत होता. कुणाचा हातपाय मोडला तर बाजूलाच उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात रवानगी व्हायची. या जखमी गोविंदांचे जणू कुणालाच सोयरसुतक नव्हते. असंवेदनांचाच उत्सव जागोजागी पाहायला मिळत होता.
एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून पारंपरिक वाद्यांच्या तालावर दारोदारी नाचत फिरणारे गोविंदा कुठे आणि हजारो, लाखोंच्या हंडीसाठी आपला जीव धोक्यात घालणारे गोविंदा कुठे असा प्रश्न आजच्या विचकट उत्साहामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात घोळत होता. पूर्वी आपल्या दारात नाचत येणाऱ्या बालगोपाळांच्या तोंडात प्रेमाने दहीपोह्य़ाचा घास भरविला जायचा. आताच्या थकलेल्या गोविंदांना वडापाव, पुलावाची पाकिटे आणि बिसलेरीच्या बाटल्या पुरविल्या जातात. त्यामुळे, रिकाम्या बाटल्यांचा आणि प्लॅस्टिकच्या प्लेटचा पडलेला खच रस्तोरस्ती दिसत होता.
महिलांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली त्यांच्यासाठी विशेष बक्षिसे ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला डान्सबारमध्ये शोभतील अशा दिलखेचक आणि मादक अदाकारी करणाऱ्या नृत्यांगना प्रेक्षकांना रिझविण्यासाठी मंचावर नाचवायच्या असा हिडीस उद्योग आयोजकांनी सुरू केला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या जागी कुठे तमाशाच्या फडाचे तर कुठे डान्सबारचे रूप आले होते. ज्याचा आनंद लुटायचा, वेध घ्यायचा त्या दहीहंडीचा तर पत्ताच दिसत नव्हता. ती कुठे तरी खूप उंचावर क्रेनला अडकवलेली. तिचे जमिनीपासूनचे अंतर पाहूनच खाली उभ्या असलेल्या गोविंदा पथकांच्या पोटात गोळा येत होता. पण या धुंदीच्या वातावरणात तेही अलगद सापळ्यात सापडत होते.
बेताल गोविंदांचा हैदोस
दहीकाल्याच्या निमित्ताने दहीहंडी फोडण्यासाठी शहरभर संचार करणाऱ्या गोविंदा पथकांनी मुंबईत अक्षरश: हैदोस घातला. महिलांवरील अत्याचारामुळे मुंबई हादरलेली असताना गोविंदांनी येता-जाता मुली, महिलांची छेड काढत उत्सव ‘साजरा’ केला. आपली घागर बक्षिसांनी भरण्यासाठी भरधाव वेगाने बस, ट्रक, टेम्पो आणि दुचाकींवरून फिरणाऱ्या गोविंदांमुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
जन्माष्टमीच्या मुहूर्तावर दहीहंडी फोडल्यानंतर मुंबईत बुधवारी मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात वाहने हाकून गोविंदांचा स्वैरसंचार सुरू झाला. गुरुवारी सकाळी ही मंडळी पुन्हा घराबाहेर पडली. दहीहंडी फोडून, अधिकाधिक माया गोळा करण्याची स्पर्धाच सुरू झाली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी भरधाव वेगात बस, ट्रक, टेम्पो, दुचाकी हाकण्यात येत होती. सिग्नल तोडून फिरणाऱ्या गोविंदांना वाहतूक पोलिसांचे अजिबात भय नव्हते. दहीकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या गोविंदांनी वाहतुकीच्या नियमांचेच नव्हे तर सामाजिक नियमांचेही उल्लंघन केले. ठिकठिकाणी महिलांवर पाण्याने भरलेले फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या भिरकावत असभ्यतेचे दर्शन काही गोविंदा पथकांनी घडविले. दारू पिऊन बेभान झालेले काही गोविंदा महिलांच्या छेडछाडीत आघाडीवर होते. खासगी गाडय़ा, बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांनाही असा त्रासदायक अनुभव आल्याच्या तक्रारी या महिलांनी केल्या. गोविंदांच्या या वर्तणुकीने मुंबईत दहिकाल्याच्या उत्साहाला गालबोट लावत बीभत्स काला केला. मुंबई विद्रूप करणाऱ्या फलकबाजीला आळा घालायाचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेने मुंबईतील फलक काढून टाकले होते.दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून राजकीय नेत्यांनी फलकबाजी करत मुंबई पुन्हा विद्रूप केली. पालिकेची परवानगी न घेताच अनेकांनी फलक झळकवून न्यायालयाचाही अवमान केला आहे. यावरून न्यायालयाचीही भीती आयोजकांना राहिलेली नसल्याचे दिसले.