महाराजा पान आणि गुलाबजाम कुल्फी

मनपसंत जेवणानंतरही अनेकदा चुकल्यासारखं वाटतं. कारण पोटभर जेवणानंतर जेवण खऱ्या अर्थाने पूर्ण होतं, ते म्हणजे पान किंवा आइस्क्रीम खाल्ल्यानंतरच. व्हेज खाणारी व्यक्ती असेल तर ती आइस्क्रीमला प्राधान्य देते तर नॉनव्हेज जेवणानंतर पानाचा तोबरा भरला जातो. पण एखाद्याला दोन्ही गोष्टी खाण्याची इच्छा असेल तर त्याने काय करावं? त्यावर आता उत्तर सापडलेलं आहे. सध्या सूर्यानेही आपले रंग दाखवायला सुरुवात केल्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना मनाला समाधान देणारा आणि घसादेखील थंड करणारा हा पदार्थ आवर्जून चाखण्यासारखा आहे. तो म्हणजे महाराजा पान. किंग्ज सर्कल येथील डेरी डॉन या आइस्क्रीमच्या दुकानात हा भन्नाट प्रकार मिळतो. हे पान थेट सूरतहून तयार होऊन येतं. या पानाचं वैशिष्टय़ म्हणजे केवळ २ सेंटीमीटरच्या काडीवर संपूर्ण पान उभं असतं. काठीच्या खालच्या बाजूला चेरी आणि वर त्रिकोणी आकाराचं चांदीचा वर्ख चढवलेलं हिरवंगार पान, त्याला खोचलेला लवंग असा त्याचा थाट. एखाद्याने वरून पाहिल्यास पान टपरीवर मिळणारे मसाला पान थंड करून दिलं जातंय की काय असा समज होऊ शकतो. तसंच साधारणपणे पान खाताना जबडा शक्य तितका ताणून संपूर्ण पान एकदाच तोंडात घाण्याची परंपरा आहे, पण हे पान खाताना त्याचा एक एक चावा घेत ते एन्जॉय करण्यात खरी मजा आहे. कारण तुम्ही जेव्हा या पानाचा पहिला बाइट घेता तेव्हा खरा गौप्यस्फोट होतो. कारण पानाच्या आतमध्ये मसाला नाही तर पानमसाला आइस्क्रीम असते. मसाला पानाच्या चवीचं हे आइस्क्रीम आपण पानच खात आहोत याची अनुभूती देतं. विशेष म्हणजे या पानाची किंमत अवघी चाळीस रुपये आहे. त्यामुळे एकाच वेळी आइस्क्रीम आणि पान खाण्याची मजा लुटता येते. पानाच्या आतमध्ये आइस्क्रीम आणि आइस्क्रीमच्या आतमध्ये पान असा अद्भुत प्रकार आहे. हे पान घरी डीप फ्रीजमध्ये ठेवल्यास जवळपास पंधरा दिवस टिकतं. मुंबईत केवळ डेरी डॉनमध्ये मिळणाऱ्या या पानाला अमेरिका, लंडन, दुबई येथे मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

डेरी डॉनची सुरुवात १९८७ साली झाली. त्यानंतर गेल्या तीस वर्षांत मुंबईभर त्याच्या वीस शाखांचा विस्तार झालाय. महाराजा पानसोबतच सॅण्डविच आइस्क्रीम ही त्यांची खासियत आहे. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, काजू अंजिर, बदाम अंजिर, बदाम चॉकलेट, रत्न मँगो, सिताफल फ्रेश, कुल्फी नट, स्पेशल ड्रायफ्रूट, डार्क चॉकलेट, शुगरलेस काजू खजूर, शुगरलेस अंजिर, शुगरलेस आलमंड, केसर पिस्ता, राजभोज, कॅरमल वॉलनट, बबल गम, न्यूयॉर्क चीज, क्रीम अ‍ॅण्ड कपकीज, काजू किसमिस, गुलाबी मस्ती, अमेरिकन नट्स, नट क्रंच, बटर स्कॉच, ब्लॅक करंट, चॉकलेट चिप्स, पानमसाला, पानगुलाब, काजू गुलकंद, थंडाई गुलकंद, स्विस केक असे तब्बल तीसहून अधिक प्रकार येथे मिळतात. चाळीस रुपयांपासून ते शंभर रुपयांना दोन्ही बाजूंना रंगीबेरंगी बिस्कीटमध्ये टाकून हे आइस्क्रीम दिले जाते.

त्याशिवाय मुंबईत फार कमी ठिकाणी मिळणारे कोकोदेखील येथे मिळते. त्यामध्ये साधा कोको, चोको चिप्स, कॅश्यू, आइस्क्रीम चोको चिप्स, कॅश्यू चोको चिप्स, स्पेशल कोको, त्याशिवाय क्रंची कोको, ओरिओ कोको, वंडर कोको, किंग कोको असे भन्नाट प्रयोग कोकोवर करण्यात आलेले आहेत. त्याच्या किमती साठ रुपयांपासून एकशेतीस रुपयांपर्यंत आहे.

गुलाबजाम कुल्फी हा येथे मिळणारा आणखीन एक वेगळा अतरंगी पदार्थ. मलई कुल्फीला उभं चिरल्यानंतर आतमध्ये चक्क गुलाबजाम आढळतो. एरव्ही साखरेच्या पाकातला अति गोड लागणारा गुलाबजाम थंडगार कुल्फीच्या आतमध्ये स्टफ केला असल्याने त्याचा गोडसरपणा थोडा कमी होतो आणि एक वेगळा प्रयोग म्हणून जिभेलाही आवडून जातो. त्याशिवाय स्लाइस कुल्फीमध्ये मलई चिक्की, पेरू चिली, ऑरेंज, ऑरेंज-बटरस्कॉच-ब्लॅककरंट असं थ्री-इन-वन आणि रोझ-केसर-पिस्ता-मलई अशी फोर-इन-वन देखील कुल्फी आहे. ज्यांना गोड खायची इच्छा आहे पण साखर वज्र्य आहे त्यांच्यासाठी येथे मलई आणि केशर-पिस्ता या शुगर फ्री कुल्फीदेखील आहेत. कॅण्डी कुल्फीमध्ये मलई, पिस्ता, गुलकंद, आंबा, चॉकलेट, रोस्टेड आलमंड, केशर पिस्ता, स्पेशल ड्रायफ्रूट आणि सीझननुसार आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी या कॅण्डी मिळतात. एकूणच गर्मीवर उतारा म्हणून डेरी डॉनला भेट देऊन नेहमीपेक्षा हे वेगळे पदार्थ चाखायला हरकत नाही.

डेरी डॉन

  • कुठे- शॉप क्रमांक २, कल्याण भवन, देना बँकजवळ, किंग्ज सर्कल, माटुंगा (पूर्व)
  • कधी- सोमवार ते रविवार दुपारी १२ ते रात्री १२.३० वाजेपर्यंत.

Twitter – @nprashant