वजन कमी करण्याच्या आशेने मुंबईत दाखल झालेल्या मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलिसाचे वजन वाढण्याचे कारण, शारीरिक आजारपण याबाबतची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतरच वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेली  बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेता येणार आहे.

लेखिका शोभा डे यांनी समाज माध्यमावर काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस निरीक्षकाची खिल्ली उडविली होती. ही पोस्ट समाजमाध्यमांवर पसरली. दरम्यान इजिप्तच्या इमान या ५०० वजनाच्या महिलेवर सैफी रुग्णालयात उपचार करणारे डॉ. मुजफ्फर लकडावाला यांनी मध्य प्रदेशातील दौलतराम जोगावत या १८० किलो वजन असलेल्या पोलिसावर शस्त्रक्रिया करण्यास पुढाकार घेतला. त्यानंतर दौलतराम यांनी वजन कमी करण्याच्या आशेने थेट मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्याची तयारी दर्शविली आहे.

दौलतराम सोमवारी मुंबईत दाखल झाले आहेत. प्राथमिक तपासणी केल्यानंतरच ही शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सैफी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. यासाठी त्यांना मध्य प्रदेश पोलिसांचे सहकार्य मिळाले आहे. मध्य प्रदेशात पोलीस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या दौलतराम जोगावत यांचे वजन १८० किलो आहे. पित्ताशयाचा आजार असल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यानंतर वजन झपाटय़ाने वाढल्याचे दौलतराम यांनी सांगितले; मात्र वजन कमीही होईल, अशी आशा पल्लवित झाल्याने दौलतराम यांना आनंद आहे.

इमानचे वजन ५० किलोने घटले

बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत दाखल झालेली इजिप्त येथील इमान अहमद (३६) या महिलेचे वजन गेल्या दोन आठवडय़ांत ५० किलोने कमी झाले आहे. आता तिला मान उचलता येणे शक्य झाले आहे. येत्या सहा महिन्यांत इमान हिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून २०० किलो वजन कमी करण्याचा सैफी रुग्णालयातील डॉक्टरांचा प्रयत्न आहे. व्यायाम आणि आहार नियंत्रण पद्धतीने शरीरातील पाणी कमी करण्यात येणार आहे.